लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धरमपेठच्या रामनगर चौकात अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यासाठी आलेल्या पथकावर एका चहाटपरीवाल्याने दगडफेक सुरू केली. यामुळे पथकातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. ही घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजता घडली. त्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू केली.
पथकाने रामनगर चौक ते रविनगर चौक आणि पुढे भरतनगर चौकापर्यंत ३६ अतिक्रमण हटविले. धंतोली झोन अंतर्गत जाटतरोडीमध्ये टॉवरसाठी निर्माण केलेल्या अवैध स्लॅबला तोडण्यात आले. राधाबाई जैस्वाल यांनी स्लॅब आणि पॅराफिट वॉलचे बांधकाम केले होते. धंतोली झोनच्या अधिकाऱ्यांनी जैस्वाल यांना नोटीस पाठविली होती. परंतु त्यांनी बांधकाम न हटविल्यामुळे सोमवारी कारवाई करण्यात आली. त्यानंतर गीता मंदिर ते बालभवन, टिळक पुतळा आणि गांधीसागर तलावापर्यंतचे ४२ अतिक्रमणे हटविण्यात आली. नेहरूनगर झोनमध्ये भांडेप्लॉट चौक ते बॉलिवूड सेंटर पॉईंट, बिडीपेठ अग्निशमन कार्यालय ते सक्करदरा चौक, गजानन शाळा ते म्हाळगीनगर चौक आणि बेसा पॉवर स्टेशनपर्यंत ५२ अतिक्रमणे हटविण्यात आली. आशिनगर झोनमध्ये इंदोरा चौक ते कमाल चौक, वैशालीनगर सिमेंट रोडपर्यंत फुटपाथवरून ठेले आणि इतर दुकानांसह ४२ अतिक्रमणे हटविण्यात आले. हनुमाननगर झोन अंतर्गत तुकडोजी पुतळा चौक ते मानेवाडा चौक, ओमकारनगर चौक ते शताब्दीनगर चौक, बेलतरोडीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे ३४ अतिक्रमणे हटविण्यात आली. यावेळी काही अतिक्रमणधारकांकडून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. लक्ष्मीनगर झोन अंतर्गत माटे चौक ते आयटी पार्क, जयताळा बाजारापर्यंत ४२ अतिक्रमणे हटविण्यात आली. यावेळी १ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई प्रवर्तन विभागाचे उपायुक्त महेश मोरोणे, निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.