नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याची प्रथा सुरू आहे. मात्र अलीकडच्या वर्षात आदिवासी संघटनांकडून या प्रथेला विरोध केला जात आहे. यंदा देखील जिल्ह्यातील गोंडवाना गणतंत्र पार्टी, युवा मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन विजयादशमीला रावण दहन प्रथा बंद करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात त्यांनी स्पष्ट केले की, महात्मा गोंडराजे रावण यांचा पुतळा जाळण्याच्या दृष्ट प्रथावर प्रतिबंध लावण्यात यावे. महात्मा राजा रावण हे आदिवासी समाजाचे पुज्यनिय आणि व अत्यंत समृद्ध संस्कृतीचा वैभवशाली वारस्याच्या अविस्मरणीय ठेवा आहे. रावणासारखा महापराक्रमी योद्धा झाला नाही व यापुढे होणार ही नाही. तामिळनाडूमध्ये महात्मा राजा रावण यांची ३५२ मंदिरे आहेत. सर्वात मोठी मुर्ती ही मध्यप्रदेशातील मंदसौर येथे आहे. महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात मेळघाट, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, झारखंड येथे महात्मा राजा रावण यांची पुजा केली जाते. रावण हे आदिम संस्कृतीचे श्रद्धास्थान व दैवत आहे. परंतु रावणाला जाळण्याची कुप्रथा व परंपरा जाणिवपूर्वक निर्माण करण्यात आली आहे.
प्रशासनाने रावणाच्या पुतळ्याच्या दहन करण्याची परवानगी देऊ नये, शासनस्तरावर या प्रथांना बंद करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देताना दिनेश सिडाम, गंगा टेकाम, शिला मरसकोल्हे, शितल मडावी, मीना कोकुर्डे, उमा सरोते, राकेश उईके, धीरज मसराम, कृष्णा सरोटे, अशोक पोयाम, ज्ञानेश्वर कुभंरे, राजू श्रीरामे आदी उपस्थित होते.