उमरेड : थकीत बिलाच्या थकबाकीदारांचे विद्युत कनेक्शन कापण्यास वीज कंपनीने सुरुवात केली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांची दुकाने-प्रतिष्ठाने बंद होती. अनेकांच्या कामधंद्यावर अवकळा आली. अशात विद्युत बिलाची थकबाकी असल्याने वीज कनेक्शन कापणे थांबवा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन उमरेड विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप राऊत यांच्याकडे सोपविण्यात आले. मागील काही दिवसांपासून दुकाने-प्रतिष्ठाने सुरू झाली असून एकाचवेळी विद्युत बिलाच्या रकमेचा भरणा करणे अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे. अशावेळी विद्युत विभागाने दोन महिन्याची सवलत द्यावी. तसेच तीन ते चार टप्प्यात विद्युत बिलाची विभागणी करावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शिष्टमंडळात सुरेश पौनीकर, सूरज इटनकर, राजेश भेंडे, जितू गिरडकर, सुभाष नान्हे, मनीष शिंगणे, महेश भुयारकर, वसीम पटेल, कुमार बावणे, रोशन झाडे आदींचा समावेश होता.
---
उमरेड विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप चव्हाण यांच्याकडे निवेदन सोपविताना व्यावसायिकांचे शिष्टमंडळ.