नागपूर : कोरोना रुग्णांच्या उपचारात प्लाझ्मा थेरेपी उपयुक्त नसल्याचा निर्वाळा देत ही थेरेपी बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असे असताना शासकीय आणि खाजगी रुग्णालयांकडूनही रुग्णांना प्लाझ्माची मागणी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. डॉक्टरांच्या मागणीनुसार रुग्णांच्या नातेवाईकांना प्लाझ्मासाठी भटकंती करावी लागते व दुप्पट, तिप्पट किमतीने खरेदी करावा लागतो. यामुळे उपचाराधीन रुग्णांचे आर्थिक व मानसिक शोषण होत असल्याने राज्य शासनानेच आता प्लाझ्मा थेरेपीबाबत स्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी केली जात आहे.
शासकीय रुग्णालयातील गरीब रुग्णांच्या मदतीसाठी व रक्तदानासाठी कार्य करणाऱ्या सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष राज खंडारे यांनी रुग्णालयांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशाेधन संचालनालयाच्या निर्देशानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया (मेडीकल) आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये यावर्षी जानेवारीपासून प्लाझ्मा थेरेपी बंद करण्यात आली आहे. मात्र असे असतानाही काेराेना रुग्णांवर उपचार करणारे डाॅक्टर्स रुग्णांना प्लाझ्मा आणण्यासाठी सांगत आहेत. शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये सर्रासपणे हा प्रकार सुरू असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी लाेकमतकडेही प्राप्त झाल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ता अनिकेत कुत्तरमारे यांच्या माहितीनुसार प्लाझ्माची मागणी करणारे दरराेजचे १० ते १५ काॅल रुग्णांच्या नातेवाईकांकडून येत आहेत. त्यामुळे उपयुक्त नसताना प्लाझ्माची मागणी रुग्णांकडून का केली जाते, असा सवाल खंडारे यांनी केला. त्यामुळे सेवा फाऊंडेशनच्यावतीने जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री, आराेग्य मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी गांभीर्याने लक्ष घालून भूमिका स्पष्ट करावी, असे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केले आहे.
उपयुक्त नाही, मृत्युदर वाढल्याने बंदी
सुरुवातीच्या काळात आयसीएमआरच्या सुचनेनुसार काेराेना रुग्णांवर उपचारासाठी महाराष्ट्र शासनाने ‘प्राेजेक्ट प्लॅटिना’ नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये सुरू करण्यात आला हाेता. मात्र प्लाझ्मा थेरेपी उपयुक्त नसल्याचे आणि यामुळे मृत्युदर वाढल्याचे निरीक्षण नाेंदवून आयसीएमआर आणि राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशाेधन महासंचालनालयाने प्लाझ्मा थेरेपी थांबविण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार मेडीकलमध्ये सुरू असलेला प्राेजेक्ट प्लॅटिना यावर्षी जानेवारीपासून बंद करण्यात आला. तशा सुचना जिल्हा प्रशासन व मेडीकल प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
दुप्पट, तिप्पट वसुली
सुरुवातीच्या काळात प्लाझ्मासाठी हाेणारी रुग्णांची लूट पाहता केंद्र शासनाच्या आराेग्य सेवाअंतर्गत सेंट्रल ड्रग स्टॅन्डर्ड कन्ट्राेल आर्गनायझेशन यांच्या मार्गदर्शक सुचनानुसार एक बॅग प्लाझ्माची किंमत ५५०० रुपये ठरविण्यात आली हाेती. आता बंदीनंतरही प्लाझ्माची मागणी हाेत आहे. त्यामुळे लवकर मिळत नसल्याने नातेवाईकांना भटकंतीमुळे मनस्ताप सहन करावा लागताे. शिवाय रक्तपेढ्यांकडून एका बॅगसाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी केली जात आहे. रुग्णाला केवळ २०० ते ४०० मिली प्लाझ्मा लावण्याच्या सुचना असताना रुग्णांना ३ ते ५ बॅग आणण्यास सांगण्यात येतात. एका बॅगचे १५ हजार याप्रमाणे नातेवाईकांना ५० ते ७५ हजार रुपये माेजावे लागतात. यामुळे आर्थिक व मानसिक शाेषण सहन करावे लागत असल्याचे राज खंडारे यांनी सांगितले.