नागपूर : वाहन खरेदीनंतर आॅप्टिकल स्मार्ट कार्डमधून रजिस्ट्रेशन (आरसी) तयार करणाऱ्या शाँग कंपनीचा प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी (आरटीओ) करार संपला. सहा महिन्याची मुदतवाढही संपली. परिणामी, मागील दोन दिवसांपासून राज्यातील सर्व कार्यालयात आरसी तयार करण्याचे काम ठप्प पडले आहे. वाहनमालकांकडून याबाबत संताप व्यक्त होताच परिवहन कार्यालयाने उद्या शनिवारपासून सर्व आरटीओ कार्यालयाला जुने आरसीबुक देण्याच्या सूचना दिल्या आहेत.आरसी तयार करण्याचे काम २००७ मध्ये ‘शाँग’ या खासगी कंपनीला देण्यात आले. एका कार्डमागे ही कंपनी ३९० रुपये घेत होती. पूर्वी आरटीओ फक्त रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणून कारचे १०० तर दुचाकीचे ३० रुपये घ्यायची. परंतु या कंपनीला कंत्राट देण्यात आल्यापासून आरटीओला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचे शुल्क मिळायचे. आॅप्टिकल स्मार्ट कार्डच्या शुल्कांमधून एकही रुपया कार्यालयाला मिळत नव्हता. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीला राज्यात एक कोटी स्मार्ट कार्डच्या वितरणापर्यंतचे कंत्राट देण्यात आले होते. सध्याच्या स्थितीत आॅप्टिकल स्मार्ट कार्डची संख्या एक कोटीच्यावर पोहचली आहे. कंत्राट संपून सुमारे सहा महिनेपेक्षा जास्त काळ लोटला. कंत्राटाची नवीन प्रक्रिया सुरू होणार असल्याने मधल्या काळात कंपनीने स्टेशनरीवर खर्च करणे बंद केले होते. यामुळे स्वीकृती पत्राचा तुटवडा पडला होता. याचा फटका शेकडो वाहनधारकाला बसला. अखेर परिवहन विभागाकडून सहा महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली. मागील आठवड्यात ती संपल्याने हा नवीन करार होईपर्यंत आरटीओ कार्यालयांना जुन्या आरसी देण्याच्या सूचना विभागाने शुक्रवारी दिल्या. (प्रतिनिधी)
दोन दिवसांपासून ‘आरसी’ देणे बंद
By admin | Published: November 29, 2014 2:51 AM