नागपूर : रनिंग रुममध्ये आल्यानंतर मोबाईल जमा करण्याचा आदेश मागे घ्यावा यासह विविध मागण्यांसाठी मध्य रेल्वेच्यानागपूर विभागातील लोकोपायलट, असिस्टंट लोकोपायलट आणि गार्डने कुटुंबीयांसह भव्य मोर्चा काढला. सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या नेतृत्वात लोकोपायलट लॉबीपासून काढण्यात आलेला मोर्चा दुपारी १.३० वाजता डीआरएम कार्यालयावर धडकला. मोर्चात सहभागी झालेल्या लोकोपायलटने ‘सिनिअर डीओएम’ मुर्दाबादच्या घोषणा देत डीआरएम कार्यालयाचा परिसर दणाणून टाकला.
नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वे मेनच्या निर्देशानुसार सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने रनिंग स्टाफला होत असलेल्या त्रासाबद्दल भव्य मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे विभागीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह, सी. पी. सिंह, बी. एस. ताकसांडे, राकेश कुमार, ओ. पी. शर्मा, बी. एन. तांती, संजय देशमुख यांनी केले. डीआरएम कार्यालयात हा मोर्चा पोहोचल्यानंतर लोकोपायलट, असिस्टंट लोकोपायलट, गार्डने आपल्या विविध मागण्यांसाठी जोरदार नारेबाजी केली. ‘सिनिअर डीओएम’ आणि इतर अधिकारी मुर्दाबादचे नारे देऊन डीआरएम कार्यालयाचा परिसर दणाणून टाकला.
आंदोलनात लेव्हल ६ ग्रेड पे ४२०० मध्ये लोकोपायलटचे पद समाप्त करण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा, एसपीएडीच्या प्रकरणात निर्धारीत मापदंडाचे पालन करावे, विविधठिकाणी साईन ऑन, साईन ऑफ करण्याचे निर्देश मागे घ्यावे, कर्मचारी कमी असल्याचे सांगून सुट्टी देण्यास मनाई करू नये, अप्रुव्ह लिंकच्या आधारावर रनिंग स्टाफची करावी, विश्रांती घेत असलेल्या कर्मचाऱ्यांना ड्युटीसाठी बुक करणे बंद करावे आदी मागण्या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या. आंदोलनानंतर अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रीक) रुपेश चांदेकर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात लोकोपायलट, असिस्टंट लोकोपायलट, गार्ड आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.