उमरेड : दारूबंदीचा ठराव पारित केल्यानंतर साधारणत: तीन वर्षे गावात दारूची दुकाने बंद होती. अशातच पुन्हा तीन वर्षांपासून तीन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध दारूचा सपाटा सुरू झाला. यामध्ये एका अवैध देशी दारूच्या दुकानाचाही समावेश आहे. यामुळे गावातील सामाजिक स्वास्थ बिघडत चालले असून, हे अवैध धंदे बंद करा, अशी मागणी हिवरा-हिवरी येथील महिलांनी केली आहे.
१,५०० लोकवस्ती असलेल्या हिवरा-हिवरी गावात अवैध दारू विक्रीचा गोरखधंदा फोफावला आहे. यामुळे गावातील त्रस्त महिलांनी याविरोधात कंबर कसली आहे. नुकतीच ग्रामपंचायत कार्यालयात महिलांनी याबाबत स्वतंत्रपणे बैठक आयोजित केली. अवैध दारू धंद्यांमुळे गावातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली असून, आता पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत या महिलांनी व्यक्त केले. तरुणी-महिलांना यांनाही त्रास सोसावा लागत असून, जगणे मुश्कील होत असल्याच्या वेदनासुद्धा यावेळी काही महिलांनी मांडल्या. अवैध धंदे बंद करा, अशी मागणी आमदार राजू पारवे यांच्याकडे करण्यात आली आहे. मनीषा कन्नाके, कलावती मोंढे, अलका खोंडे, सुषमा मोंढे, सविता कोल्हे, कल्पना मेश्राम, पपिता मोंढे, माला डंभारे, सविता कोराम, कविता बोडे, सुनंदा पाल, प्रभा तांगडे, सुंदर झाडे, संगीता शेंडे, कल्पना मुळे, उषा मेश्राम आदींसह शेकडो महिलांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
--
शाळकरी मुलं आणि तरुण
अलीकडे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. शाळकरी मुलं, महाविद्यालयातील तरुण दिवसभर घर, परिसरात असतात. कोरोनामुळे शिक्षणाचे दरवाजेच बंद असल्याने ही मुलं-तरुणाई व्यसनाधिनतेकडे वळत आहेत. ज्या मुलांना अभ्यासाचा ओढा होता, ती मुलं आता या अवैध दारूच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. पोलीस यंत्रणेला याबाबतची इत्थंभूत माहिती असतानाही कोणत्याही प्रकारची कारवाई केल्या जात नाही, असाही आरोप या महिलांचा आहे.
--
भरचौकात मारहाण
अवैध दारूच्या दुकानांमुळे गावात भांडण, वादविवाद आणि भर चौकात मारहाणीचेही प्रकार घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच अश्लील शब्दात बोलणाऱ्या एका दारूड्याला बेदम मारहाण झाल्याचे बोलले जात आहे. अतिशय मग्रुरीची आणि चिखलफेक करणारी भाषा वापरल्याने या दारूड्याला काहींनी चांगलेच धुतले. वारंवार घडणाऱ्या या घडामोडींमुळे गावात अशांतता निर्माण होत आहे.