लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : महालगाव (ता. कामठी) येथे अवैध दारूविक्रीसाेबतच अवैध धंद्यांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे अवैध धंदे कायम बंद करण्यात यावे, असा ठराव ग्रामपंचायतच्या आमसभेत एकमताने पारित करण्यात आला असून, या ठरावाच्या प्रती पुढील कार्यवाहीसाठी माैदा पाेलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे, कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती महालगावचे सरपंच प्रकाश गजभिये यांनी दिली.
नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या महालगाव येथे अवैध दारूविक्री, सट्टापट्टी, मटका व इतर अवैध धंद्यांना उधाण आले आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच प्रकाश गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आमसभा बाेलावण्यात आली हाेती. या आमसभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय हाेती. महालगाव परिसरात खासगी उद्याेगधंदे व कंपन्या अधिक असल्याने कामगारांचे वास्तव्यही माेठ्या प्रमाणात आहे.
या अवैध धंद्यांना कायमचा आळा घालण्यासाठी प्रशासनाकडे अनेकदा मागणी केली. मात्र काहीही उपयाेग झाला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे आमसभेत यावर विस्तृत चर्चा करून सर्व अवैध धंदे कायमचे बंद करण्याबाबत एकमाताने ठराव घेण्यात आला. या ठरावाच्या प्रती जिल्हा व पाेलीस प्रशासनाला पाठविण्यात आल्या आहेत. प्रशासनाने या ठरावावर सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदाेलन केले जाईल, असा इशाराही स्थानिक महिलांसह नागरिकांनी दिला आहे.
या आमसभेला अवंतिका लेकुरवाळे, उपसरपंच निर्मला इंगोले, ग्रामपंचायत सदस्य अनिल ठाकरे, कल्पना जगताप, जोत्स्ना तिवाडे, ललित वैरागडे यांच्यासह गावातील महिला व नागरिक माेठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे संचालन व आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी प्रकाश जगडे यांनी केले. प्रशासन या ठरावावर काय निर्णय घेते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.