लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारकडून दलित, शोषित पीडित समाजावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. वर्णव्यवस्था मानणारे जातीयवादी मानसिकतेचे लोक पुन्हा दलितांना गुलाम करण्याचे षड्यंत्र रचत असल्याचा आरोप करीत राष्ट्रीय आदिम कृती समितीच्यावतीने शुक्रवारी संविधान चौकात उग्र प्रदर्शन करण्यात आले. संविधानाच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध असून संविधानाला हात लावाल तर खबरदार, असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.विश्वनाथ आसई, अॅड. नंदा पराते, दे.बा. नांदकर, धनंजय धापोडकर, चंद्रभान पराते, धनराज पखाले, मनोहर घोराडकर, ओमप्रकाश पाठराबे, प्रकाश दुलवाले, नागोराव पराते, विठ्ठल बाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘संविधानाचा सन्मान झालाच पाहिजे, अॅट्रासिटी कायद्याची कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विजय असो, हलबांना हिंदू म्हणून बोगस करणे बंद करा....’ आदी गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. अॅड. नंदा पराते म्हणाल्या, प्राचीन इतिहास व पुराव्यांकडे सरकार दुर्लक्ष करून अन्याय करीत आहे. हलबांना कोष्टी ठरवून नोकरीवरून काढण्याचा सपाटा भाजपा सरकारने सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला. धर्म, रहिवास व धंद्याच्या नावाखाली आदिवासींना बोगस करण्याचे कृत्य सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्ती जाळून संविधानाचे रक्षण करण्याची शपथ घेण्यात आली. अॅट्रासिटी समर्थनातील कोणत्याही आंदोलनास आदिमचा पाठिंबा राहिल, असे जाहीर करण्यात आले. यावेळी आदिम हलबा, हलबी, माना गोवारी, धनगर, धोबा, काळी, मन्नेवार, छत्री, ठाकूर आदी समाजातील शेकडो बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला.