महापालिका : सुपारीच्या सात गोदामांवर धाडीनागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) न भरणाऱ्या सुपारी व्यापाऱ्याच्या कळमना मार्केट परिसरातील सात गोदामांवर एलबीटी विभागाच्या सात पथकांनी सोमवारी धाडी घातल्या. येथून आक्षेपार्ह रेकॉर्ड जप्त करण्याची कारवाई सुरू असतानाच काँग्रेसच्या काही नेत्यांनी आयुक्त श्याम वर्धने यांना फोन केले. त्यामुळे कारवाई थांबविण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सुपारी व्यापाऱ्यांनी कळमना भागातील गोदामात एलबीटी न भरता सात लाख किलो सुपारी व बदामाचा साठा केल्याची माहिती खबऱ्याकडून विभागाला मिळाली होती. त्याआधारे एलबीटी विभागाचे अधीक्षक मिलिंद मेश्राम व उपायुक्त प्रमोद भुसारी यांच्या नेतृत्वात सात पथकांनी सोमवारी सकाळी या धाडी घातल्या. यात ७० कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. पथकांना गोदामात एलबीटी न भरलेली सुपारी, बदाम व किसमिसचा मोठा साठा आढळून आला. व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचा एलबीटी न भरल्याचे कागदपत्रावरून निदर्शनास आले. अधिकारी पडताळणी करीत असतानाच काही काँग्रेस नेत्यांनी वर्धने यांना फोन करून कारवाई थांबविण्यास सांगितले. यावरून त्यांनी एलबीटी विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाई थांबविण्याची सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी श्याम वर्धने यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही. एलबीटीमुळे मनपाचे उत्पन्न कमी झाले आहे. याचा शहरातील विकास कामांवर परिणाम होत आहे. याची दखल घेत उत्पन्नात वाढ करण्यासाठी मनपातील पदाधिकाऱ्यांनी एलबीटी विभागाला करचोरी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईच्या सूचना केल्या असतानाही ही कारवाई थांबविण्यात आल्याने मनपात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
राजकीय दबावामुळे एलबीटी कारवाई रोखली?
By admin | Published: August 05, 2014 1:07 AM