नागपूर : पुनर्वसनाशी संबंधित मागण्यांबाबत चर्चा करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याने मिहान प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीने रविवारी दुपारी वर्धा मार्गावरील शिवणगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले.पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर समितीचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. तेथे त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांची भेट घेतली. कुंभारे यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले, असे समितीचे सचिव नटराज पिल्लई यांनी सांगितले.प्रकल्पग्रस्तांना १५०० चौ.फू. भूखंड व १० लाखाचा मोबदला द्यावा, प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी, आरोग्य सेवेच्या सवलती आणि रोजगाराचे प्रशिक्षण तसेच रोजगार सुरू करण्यासाठी ४० लाखाचे कर्ज द्यावे, आदी समितीच्या मागण्या आहेत. यासाठी त्यांनी यापूर्वी उपोषण आणि मोर्चेही काढले. तीनवेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी त्यांना मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेऊ व त्यात समितीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करू, असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात पुनर्वसनाच्या कामाला सुरुवात झाली असून, प्रकल्पग्रस्तांना १५०० ऐवजी फक्त १००० चौ.फू. भूखंड देण्याचा निर्णय झाला आहे. समितीशी चर्चा न करताच कार्यवाही सुरू केल्याने त्याचा निषेध करण्यासाठी रविवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मिळावी आणि त्यात समितीच्या मागण्यांसंदर्भात चर्चा व्हावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी आश्वस्त केले आहे, असे पिल्लई यांनी सांगितले. शासनाकडून मिळालेले आश्वासन पाळल्या गेले नाही तर ८ तारखेपासून उपोषण केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकते अण्णा हजारे यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. आंदोलनाचे नेतृत्व पिल्लई यांच्यासह संजय बोडे, हेमरुन, सुभाष अंबोरकर आणि रोहित जयस्वाल यांनी केले.स्वाईन फ्लू उपचारविक्तुबाबानगरात स्वाईन फ्लूची साथ पसरत असून, त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी या भागात विशेष शिबिर सुरू करण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे पिल्लई यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मिहान प्रकल्पग्रस्तांचे रास्ता रोको
By admin | Published: March 02, 2015 2:29 AM