नागपूर : गृहविलगीकरणात असलेले कोरोनाबाधित रुग्ण घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले होते. याला आळा बसावा यासाठी महापालिकेच्या दहा झोन कार्यालयांतर्गत गृहविलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या घरावर स्टीकर लावण्याला १८ मार्चपासून सुरुवात केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अशा स्वरूपाचे स्टीकर लावण्याला मनाई असल्याने ही मोहीम थांबविण्यात आली आहे.
स्टीकरवर पॉझिटिव्ह कोविड-१९ रुग्ण होम आयसोलेशन असे नमूद करून त्यामध्ये रुग्णाचे नाव व होम आयसोलेशनचा कालावधी(केव्हापासून केव्हापर्यंत)सुद्धा त्यामध्ये नमूद करण्यात येत होते. यामुळे पाणी व वीज मीटरचे रीडिंग तसेच अन्य आवश्यक कामासाठी घरी कुणी येत नसल्याने अडचणी वाढल्या होत्या. परंतु आता स्टीकर लागणार नसल्याने होम आयसोलेशनमधील रुग्णांना दिलासा मिळाला आहे. मात्र शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता गृहविलगीकरणातील रुग्णांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. रुग्णांनी नियमांचे पालन न केल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.