नागपूर : प्राणघातक नायलॉन मांजाची फेसबुकवर केली जाणारी विक्री तातडीने थांबवा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला.
यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालय मित्र ॲड. देवेंद्र चव्हाण यांनी फेसबुकवर विविध नावाने नायलॉन मांजाची विक्री केली जाते, अशी माहिती दिली. फेसबुकला त्यावर समाधानकारक स्पष्टीकरण सादर करता आले नाही.
परिणामी, न्यायालयाने हा आदेश दिला आणि आदेशाच्या अंमलबजावणीसंदर्भात येत्या शुक्रवारपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. राज्याच्या पर्यावरण विभागाने १ मार्च २०२३ रोजी अधिसूचना जारी करून नायलॉन मांजासह काच पावडर, धातू किंवा अन्य कोणताही तीक्ष्ण पदार्थ लावलेल्या धाग्याची विक्री, उत्पादन, साठा, पुरवठा व वापर करण्याला बंदी केली आहे. त्यामुळे पतंग उडविण्यासाठी केवळ साधा सुती धागाच वापरणे आवश्यक आहे.