कमलेश वानखेडे
नागपूर : कोरोना काळात दक्षिण एक्सप्रेस, जीटी एक्सप्रेस, जबलपूर एक्सप्रेस, दानापूर एक्सप्रेस या चार रेल्वे गाड्यांचा नरखेड येथील थांबा बंद करण्यात आला. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ६० ते ७० किमीचा प्रवास करून शाळा-कोलेजमध्ये जावे लागते. त्यामुळे या गाड्या लवकरात लवकर पुन्हा सुरू कराव्या, अशी विनंती खा. श्यामकुमार बर्वे यांनी लोकसभेत केली.
खा. बर्वे यांनी सांगितले की, नागपूर-रामटेक लोकसभा मतदारसंघातील अनेक रेल्वे गाड्या कोरोना काळात बंद करण्यात आल्या होत्या. दोन-अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतरही या गाड्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. या गाड्या लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात सध्या ४१ रेल्वे प्रकल्प स्वीकृत असून त्यासाठी ८१ हजार ८५० कोटींची गरज आहे. परंतु, बजेटमध्ये फक्त १५ हजार ५०० कोटी मंजूर झाले आहेत. त्यांनी तफावत अध्यक्ष महोदयांच्या लक्षात आणून दिली व यावर सरकारला जाब विचारला. २०१४ मध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने रेल्वेच्या १७ प्रमुख क्षेत्रांना शंभर टक्के एफडीआयसाठी खुलं केले. रेल्वे आधुनिकीकरणाच्या नावावर खासगी कंपन्यांना मूल्यवान भूमी ४५ वर्षांच्या लीजवर दिल्या गेल्या या खासगीकरणाचा खा. बर्वे यांनी जाहीर विरोध दर्शविला.
विद्यार्थी सवलत सुरू करा
रेल्वेमध्ये वृद्धांसाठी कमी झालेला कोटा पुन्हा सुरू करावा आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा काळातील प्रवासादरम्यान मिळणारी सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणीही खा. बर्वे यांनी लोकसबा अध्यक्षांकडे केली.