वनभवनतर्फे संयुक्त जयंती कार्यक्रम : कृष्णा कांबळे यांचे आवाहन नागपूर : महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील समस्त मागासवर्गीय आणि महिलांसाठी आयुष्यभर समर्पण भावनेने कार्य केले आहे. त्यामुळेच महिलांना समान वेतन, मतदानाचा अधिकार व संपत्तीत समान वाटा मिळालेला आहे. एवढेच नव्हे तर आज सर्व भारतीयांची जी सर्वांगीण प्रगती झाली आहे त्याचे श्रेय बाबासाहेबांनी संविधानामध्ये केलेल्या सर्वसमावेशक तरतुदींना जाते. एवढ्यावरच ते थांबले नाही तर ज्यावेळी संसदेत हिंदू कोड बिल पारित झाले नाही त्यावेळेस त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भारतीय समाजाला समर्पण भावनेचा परिचय दिला. तरी समाजातील जातीयतेची कावीळ दूर सारून फुले-आंबेडकर यांच्या कार्याकडे जातीय चष्म्यातून न पाहता राष्ट्रपुरुष या दृष्टीने पाहण्याची मानसिकता तयार करावी, असे आवाहन प्रसिद्घ कर्करोग तज्ज्ञ डॉ. कृष्णा कांबळे यांनी केले. प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील वनभवन येथे संयुक्त समारोह समितीतर्फे आयोजित म. फुले व डॉ. आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) के. एन. खवारे होते. अतिथी म्हणून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. दिलीप सिंग, डॉ. एस. एच. पाटील, डॉ. प्रवीण श्रीवास्तव, एन. एच. काकोडकर, टी. के. चौबे, एस. जी. टेंभूर्णीकर, मुख्य वनसंरक्षक डॉ. एस. एस. श्रीवास्तव, व्ही. व्ही. गुरमे, उपवनसंरक्षक मल्लिाकार्जुन व प्रशासकीय अधिकारी प्रकाश बमनोटे उपस्थित होते. यावेळी के. एन. खवारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की, महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांची जयंती ही आनंदासाठी साजरी केली जात नसून त्यांनी भारतीय समाजाला शिक्षण, अस्पृश्यता निवारण तसेच समता प्रस्थापित करण्यासाठी जे मोलाचे योगदान दिले, किंबहूना त्यांनी आपल्याला जो वारसा दिला त्याचे संचित म्हणून आपण त्यांची जयंती साजरी करीत असतो, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
जातीय चष्म्यातून पाहणे बंद करा!
By admin | Published: April 24, 2017 1:58 AM