नागपूर : ऐन रबी पिके हाती येतानाच सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात गारांसह वादळी पाऊस बरसला. या पावसाने गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान केले. तर आणखी एक दिवस ढगाळ व पावसाचे वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकरी हादरले आहेत. दरम्यान, बाभूळगाव तालुक्यात शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला. तर यवतमाळात मजुरांच्या झोपड्या उडाल्या.
जिल्ह्यात ६० हजार हेक्टरवर रबीची पेरणी झाली आहे. यातील हरभरा आणि गहू काढणीला आला आहे. सोमवारच्या वादळवाऱ्यामुळे गहू आडवा झाला आहे. हरभऱ्याला गारीचा फटका बसला आहे. सोमवारी सायंकाळी यवतमाळात मेघगर्जनेसह पाऊस झाला. १५ मिनिटे बोराएवढ्या गारा पडल्या. रस्त्यावर आणि छतांवर गारांचा खच पडला होता. या गारीने भाजीपाला आणि आंबा बहाराचे मोठे नुकसान झाले. यवतमाळसह उमरखेड, महागाव, राळेगाव, कळंब, राळेगाव, नेर, घाटंजी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्याात ४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नेर तालुक्यातील सोनखास परिसरात आवळ्याच्या आकाराएवढ्या गारा पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मेटीखेडा, मोहदा परिसरात दुपारी ४ वाजतापासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर पावसासह गारांनी थैमान घातले होते.
यवतमाळसह प्रत्येक तालुक्यात वीटभट्ट्या उभारण्यात आल्या आहेत. वीटांचा कच्चा माल उघड्यावर असतानाच पाऊस बरसल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. पशुपक्ष्यांनाही गारांचा तडाखा सोसावा लागला. बाभूळगाव तालुक्यात झालेल्या गारपिटीत शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. यात चिमण्या, पोपट, कावळे अशा पक्ष्यांचा समावेश आहे. पांढरकवडा, घाटंजी तालुक्यात गव्हाचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे. अनेक शेतात गव्हाची कापणी करून शेतातच गंजी ठेवण्यात आली होती. या पिकाचे गारांमुळे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गहू अक्षरश: आडवा झाला आहे. डोळ्यापुढे पिकांचे नुकसान पाहून अनेक शेतकऱ्यांना अश्रूही अनावर झाले होते.