लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : तालुक्यात रविवारी सायंकाळी जाेरदार वादळासह पावसाला सुरुवात झाली. या वादळामुळे नरखेड शहरासह तालुक्याच्या दक्षिण भागातील फळबागांचे माेठे नुकसान झाले असून, काहींच्या घरांवरील टिनपत्रे उडाले. राेडवर माेठी झाडे उन्मळून पडली हाेती. शिवाय, अनेक गावांमधील वीजपुरवठा तब्बल सात तास बंद हाेती.
नरखेड तालुक्यातील दक्षिण भागात रविवारी सायंकाळी ५ वाजतापासून वादळाला सुरुवात झाली. काही वेळात पावसाच्या सरी बरसायला लागल्या. या वादळामुळे नरखेड शहरातील तहसील कार्यालय परिसर, पाेलीस ठाणे व सावरगाव राेडवरील माेठी झाडे उन्मळून पडली. शहरातील काही नागरिकांच्या घरांवरील टिनपत्र्यांचे छत उडाले. तालुक्यातील मन्नाथखेडी, अंबाडा (देशमुख), येणीकोणी, टोळापार, पिंपळगाव (वखाजी), खरसोली, थुगाव (निपाणी), खेडी, वडेगाव (उमरी), तीनखेडा, दिंदरगाव, पिंपळगाव (राऊत) या गावांना वादळासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला.
यात वादळी पावसामुळे या भागातील संत्रा, माेसंबी, केळीच्या बागांचे तसेच भाजीपाल्याच्या पिकांचे माेठे नुकसान झाले आहे. दिंदरगाव येथील सरोज नंदघये व वासुदेव नंदघये यांच्यासह इतरांच्या घरांवरील टिनाचे छप्पर उडाले. त्यामुळे घरातील साहित्य भिजल्याने त्यांचे नुकसान झाले. या वादळामुळे बहुतांश गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला हाेता. तब्बल सात तासानंतर काही गावांमधील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला हाेता. वादळामुळे व वीज काेसळल्याने तालुक्यात कुठेही प्राणहानी झाल्याचे वृत्त नाही.
....
सर्वेक्षण करण्याची मागणी
या वादळ व अवकाळी पावसामुळे संत्रा, माेसंबी व केळाच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. स्थानिक नेत्यांनी सायंकाळी तलाठ्यांच्या मदतीने या नुकसानीची पाहणी केली. काेराेना संक्रमणामुळे शेतकरी आधीच संकटात आहेत. त्यात वादळ व पावसामुळे त्यांच्यावर नवीन संकट ओढवले आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनाने या भागाचे तातडीने सर्वेक्षण करावे तसेच त्यांना याेग्य ती नुकसानभरपाई जाहीर करावी व घरांच्या दुरुस्तीसाठी याेग्य ती आर्थिक मदत करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.