जिल्हा नियोजन समितीची बैठक नागपूर : नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी दुपारी १ वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यासंदर्भातील प्रश्नावर वादळ उठण्याची शक्यता आहे. लोकमतने दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा मिळावा, यासाठी अभियान छेडले आहे. या अभियानांतर्गत लोकप्रतिनिधींनी हा विषय लावून धरण्याचे आश्वासन दिले होते. यातच पालकमंत्र्यांनी दीक्षाभूमीच्या सर्वांगिण विकासासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश बजावले होते. दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गेल्याच वर्षी निर्णय होऊन तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. तेव्हा सोमवारी होणाऱ्या बैठकीत यावर लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. यापूर्वी ही सभा ११ वाजता आयोजित करण्यात आली होती. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्व लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा नियोजन समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. या सभेस दुपारी १ वाजता सर्व विभागप्रमुखांनी उपस्थित राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिल्या आहेत.