नागपूर : केवळ विदर्भच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये नागरिकांना उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. बहुतेक शहरांचे तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात ४१.६ अंश तापमानासह साेलापूर सर्वात उष्ण शहर ठरले तर थंड शहर म्हणून ओळख असलेल्या नाशकातही तापमानाने भरारी घेतली. येथे गुरुवारी ३९.३ अंश तापमान हाेते.
सध्या सर्वच भागात उष्णतेचा प्रकाेप सुरू आहे. मुंबईमध्ये नुकतीच तापमानाने चाळीशी पार केली हाेती. दाेन दिवसांत तापमानात घट झाली असली तरी सरासरीपेक्षा ते ४ अंशाने अधिकच आहे. येथे ३६.९ अंश तापमान नाेंदविण्यात आले. पुणे शहरही सध्या तापाचा सामना करीत आहे. एप्रिल-मे मध्ये ३८, ३९ अंशावर जाणाऱ्या पुण्यात मार्चमध्येच ताप वाढला असून, गुरुवारी ३९.१ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. इतर शहरांमध्ये नांदेड ४१.२ अंश, बीड ४०.१ अंश, परभणी ४०.९ अंश, मालेगाव ४० अंश, औरंगाबाद ३९.५ अंश व काेल्हापुरात ३९.५ अंश कमाल तापमानाची नाेंद झाली.
दरम्यान, पुढच्या दाेन दिवसांत तापमानात घसरण हाेण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात तयार हाेणारे वादळ महाराष्ट्राकडे घाेंगावत असून, त्याच्या प्रभावाने विदर्भासह राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहील. काेकणमध्येही हलका पाऊस हाेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.