आमीन चौहाननागपूर:एके दिवशी ठरवलं. हिंमत केली अन मोहन महाराजांना शाळेजवळ हे दुकान लावू नका, अशी ताकीद दिली. त्यांनी साहजिकच प्रतिकार केला. पण मी शाळेत व ते एकटेच, म्हणून काहीशी माघार घेत ते ढकलगाडी लोटत शाळेपासून निघून गेले.या प्रसंगानंतर माझं मन मलाच खात होतं. संपली कटकट एकदाची, असं म्हणून मन आनंदित होत होतं तर कधी आता हा काय आफत आणतो म्हणून भीतीही वाटत होती. शाळा सुटली आणि आम्ही सगळे घरी आलो. दुसरे दिवशी तत्परतेने तयारी केली. गाडीने शाळा गाठली. शाळा उघडून शाळेजवळ फेरफटका मारला. गावातील सगळं वातावरण शांत वाटत होतं. मला खूप बरं वाटलं. जरा हिंमत आली. आपण थेट मोहन महाराजांचं घर गाठून त्यांची थेट भेट घ्यावी असा विचार मनात येतो न येतो तोच माझी पावलं त्यांच्या घराकडे वळली व थांबली ती थेट त्यांच्या दारातच! मला दारात पाहून महाराजही थोडे गडबडलेच. मीच बोलायला सुरुवात केली. इकडचे-तिकडचे बोलणे झाल्यावर ते कालच्या विषयावर बोलू लागले. दोन दिवसांपासून धंदा नाही. घराजवळ पाहिजे तशी विक्री होत नाही. गावात सारे विकतात मग मलाच ‘ना’ का? महाराजांनी थेट विषयाला हात घातला. असं बरंच ते सांगू लागले. एव्हाना काही लोकं जमली. मी त्यांचं सारं ऐकून घेतलं. त्यांचा नातू जवळच उभा होता. ढकलगाडीला लटकवलेली एक गुटखा पुडी मी तोडली व फोडली. म्हटलं, ‘हा तुमचा नातू ना! याला खाऊ घालू का?’ ते लगेच नाही म्हणाले. हे जहर आहे हे तुम्हाला माहीत आहे. ते तुम्ही आपल्या नातवाला कसे खाऊ घालणार, मी परत त्यांना प्रश्न केला. जसा हा तुमचा नातू तशीच ही गावातली मुलं समजा. हे जहर विकणं बंद करा. दुसरा छोटा-मोठा धंदा पाहा. आम्ही मदत करू. सुरुवातीला थोडा त्रास होईल. पुढे जमेलच की हळूहळू. असं म्हणून मी शाळेत आलो.आता शाळेत जाताना मोहन महाराज बरेच वेळा भेटतात. तीच ढकलगाडी घेऊन. पण गावात नव्हे तर दिग्रस शहरात. अन् गाडीवर असतो हिरवा व ताजा ताजा पौष्टिक भाजीपाला. बरेच वेळा मी त्यांच्याकडील भाजी विकत घेतो. अनेक वेळा गरज नसली तरीही!भाजी विकता विकता आज दोन वर्षे झाली मोहन महाराज यांना. त्यांनी आपली बरीच ओळख व अनेक ग्राहक जोडून ठेवले आहेत. याच ओळखीतून एका चांगल्या ग्राहकाने शेतात विहिरीची योजना सांगितली. योजनेसाठी अर्ज केला. विहीर मंजूर झाली. आज मोहन महाराज यांच्याकडे विहिरीचे काम सुरू आहे. आता ते लवकरच स्वत:च भाजीपाला पिकवून विकणार आहेत.
सुटली दारू, तंबाखूही!पालक संवादातून पालकांनी आपली व्यसने सोडल्याची काही उदाहरणे समोर आली आहेत. विलास या विद्यार्थ्याने वडील दारू पितात मग मी त्यांच्याशी संवाद कसा साधू ? अशी समस्या शिक्षकांजवळ मांडली. शिक्षकांनी विलासच्या वडिलांशी संपर्क साधून त्यांना वरील घटनाक्रम सांगितला. त्यांचे समुपदेशन केले. गुलाबरावांनी ही बाब गंभीरपणे घेतली. आज दोन वर्षे झाली त्यांनी आपली दारू सोडली आहे.