लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपण वन पर्यटनाला जातो, गड किल्ल्यांना भेटी देतो, सागरांच्या लाटांवर स्वार होतो, या सगळ्या स्थळांची माहिती जाणून घेणे, त्याचा इतिहास समजून घेणेही आपल्याला आवडते. अशावेळी आपल्या मदतीला येतात ते पर्यटक मार्गदर्शक म्हणजे गाईड. पुरुषांची मक्तदारी असलेल्या या क्षेत्रात महिलांनी कधीच शिरकाव केला असला तरी घनदाट जंगलात पर्यटकांना घेऊन जाणे, त्यांची सुरक्षितता जपताना त्यांना त्या वनाची, तिथल्या जैवविविधतेची संपूर्ण आणि अचूक माहिती देणं हे जरा हटके काम स्वीकारले आहे राज्यातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील स्थानिक युवतींनी.. या वेगळ्या वाटेवरून जाताना त्यांनी स्वावलंबनाचा मार्ग तर चोखाळला आहेच परंतु निसर्ग रक्षणाच्या कामात योगदान ही दिले आहे.राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगांव-नागझिरा, सह्याद्री आणि ताडोबा- अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. यापैकी ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसोबत जंगल भ्रमंती करताना या महिला गाईड तिथे अधिवास करणाऱ्या वाघोबाच्या साम्राज्याची गोष्ट सांगत आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ३०, पेंच व्याघ्र प्रकल्पात १२ आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ५ महिला गाईड कार्यरत आहेत.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात तसेच वनालगतच्या गावांमध्ये स्थानिक महिलांना विविध व्यवसाय- उद्योगाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण केले जात आहे. त्याचाच हा एक भाग आहे. अचूक आणि परिपूर्ण माहितीने समृद्ध गाईड आलेल्या पर्यटकाला जंगलभ्रमंतीचा उत्तम आनंद देऊ शकतो हे विचारात घेऊन या वन पर्यटक मार्गदर्शकांना प्रशिक्षण दिले गेले आहे.प्रशिक्षण, रोजगार संधी आणि उत्पन्न वृद्धीपक्ष्यांचे संगीत आणि वाघाच्या डरकाळ्यांनी व्याघ्र प्रकल्पातील डोंगर रांगा जिवंत होतात असे म्हटले जाते. याच डोंगर रांगात वसलेल्या, व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात, वनालगतच्या गावात राहणाºया स्थानिक लोकांनी ही वने जिवंत ठेवण्यासाठी आणि वाढण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. अशावेळी या लोकांना रोजगाराच्या पर्यायी संधी उपलब्ध करून देणे, त्या दृष्टीने आवश्यक असलेले प्रशिक्षण देणे, अत्यावश्यक पायाभूत सुविधा या गावांमध्ये उपलब्ध करून देणे आणि त्यांचे वनांवरचे अवलंबित्व कमी करणे यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतून या कामाला गती देण्यात आली आहे. पर्यटक मार्गदर्शक, महिलांसाठी शिलाई मशिन युनिट, दुभत्या पशुधनाचे वाटप, होम स्टे, वाहनचालक, आॅटोमोबाईल प्रशिक्षण अशा विविध माध्यमातून स्थानिकांचे सक्षमीकरणाचे काम सुरु आहे. यासाठी आपण आय.टी.सी सारख्या अनेक संस्थांची मदत घेतली आहे. महिला वन पर्यटक मार्गदर्शक हा त्यातीलच एक नावीन्यपूर्ण उपक्रम आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.एक सेल्फी तर हवाचपर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात घेऊन जातांना सुरुवातीला आम्ही एकमेकांशी नवखे असलो तरी एका प्रवासात आमची त्या कुटुंबासोबत मैत्री होते आम्ही त्यांच्या कुटुंबापैकीच एक होऊन जातो. वाघ पाहिल्यानंतर पर्यटकांचा आनंद किती विलक्षण असतो याची आम्हाला अनुभूती होते, वाघाशिवाय दिसणाºया इतर वन्यजीवांना पाहून ही पर्यटक हरखून जातात. पर्यटक जेंव्हा परतीच्या प्रवासाला निघतात तेंव्हा ज्या गाईडमुळे त्यांची व्याघ्र प्रकल्पातील सहल अविस्मरणीय झाली त्यांच्याबरोबर एक सेल्फी तर हवाच ही त्यांची मागणी आम्हाला ही आनंद देऊन जात असल्याची प्रतिक्रिया पी.ए बोरजे या महिला पर्यटक मार्गदर्शकाने दिली आहे.
राज्यात आता महिला गाईड सांगताहेत वाघोबाच्या साम्राज्याची गोष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 1:06 PM
राज्यातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील स्थानिक युवतींनी.. या वेगळ्या वाटेवरून जाताना त्यांनी स्वावलंबनाचा मार्ग तर चोखाळला आहेच परंतु निसर्ग रक्षणाच्या कामात योगदान ही दिले आहे.
ठळक मुद्देमेळघाट,पेंच, ताडोबात कार्यरत