नागपूर : पशुपक्ष्यांमधील प्रेम, स्नेहाचे व्यवहार कधी कधी मानवांनाही अचंबित करतात, असाच एक प्रकार गाेंदिया जिल्ह्यातील पांगडी विभागाच्या परिसरात पक्षिमित्रांच्या निरीक्षणात नाेंदविला गेला आहे. स्वर्गीय नर्तक या अतिशय देखण्या पक्ष्याच्या पिल्लांना चष्मेवाला हा पक्षी चक्क त्यांच्या घरट्यात येऊन अन्न खाऊ घालताे अन् विष्ठाही साफ करताे हे कॅमेराबद्ध झाले आहे.
स्वर्गीय नर्तक (Paradise Flycatcher) या पक्ष्याचे दर्शन व्हावे असे प्रत्येक पक्षी निरीक्षकाचे स्वप्न असते. गोंदियापासून १५ किमीच्या अंतरावरील पांगडी शिवारात या पक्ष्याचा वावर असल्याची माहिती गोंदियातील शरद गजभिये यांनी भंडाऱ्याचे डाॅ. रवी पाठेकर व रत्नदीप खोब्रागडे यांना दिल्यावर या तिघांनी पांगडी शिवार गाठून स्वर्गीय नर्तक या पक्ष्याच्या घरट्याचा शाेध घेण्यास सुरुवात केली. त्यांनी ‘लाेकमत’ला सांगितले की, त्यांना एका निंबाच्या झाडावर या पक्ष्याचे घरटे दिसले त्यामध्ये चार पिल्ले हाेती. या पिल्लांचे माता-पिता हे त्याच झाडाच्या वरच्या बाजूला बसून सतत आवाज करीत होते. पक्षिमित्रांनी घरट्याच्या जवळ झाडाच्या पाठीमागे बसून घरट्याचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली.
पाऊण तासानंतर चष्मेवाला (Indian White Eye) नावाचा पक्षी आपल्या चोचीत एक कीटक घेऊन घरट्याच्या विरुद्ध दिशेच्या फांदीवर येऊन बसला. १५ मिनिटानंतर तो त्या घरट्याजवळ आला. या चारही पिल्लांनी घरट्यातून आपली मान उंचावित या पक्ष्याच्या दिशेने चोच उघडून आवाज केला, लगेच या पक्षाने आपली चोच एका पिल्लाच्या चोचीत टाकून त्याला ते कीटक खाऊ घातले अन् घरट्यातील एका पिल्लाच्या मागच्या बाजूने त्याची पांढरी विष्ठा पिल्लाच्या आपल्या चोचीत घेऊन उडून गेला.
पिल्ले स्वर्गीय नर्तकाची अन् खाऊ घालताे चष्मेवाला असा अजब प्रकार पाहून पक्षिमित्र चांगलेच अचंबित झाले. चष्मेवाला पक्ष्याने जवळपास चार ते पांच वेळा अशाच प्रकारे अन्न भरविले व पिल्लांची विष्ठा साफ केली. निसर्ग नियमानुसार जे काम या पिल्लांच्या आई-बाबांनी करायला पाहिजे होते. ते सर्वच काम हा वेगळ्या प्रजातीचा पक्षी करीत असल्याचे कॅमेराबद्धही करण्यात आले आहे.
वेगळ्या प्रजातींच्या पक्ष्यांच्या पिल्लांना दुसराच कुठलातरी पक्षी अन्न भरवितो हे चित्र मात्र निश्चितच पक्षिप्रेमींच्या अभ्यासाच्या शाखा विस्तारित करणारे आहे. आम्ही मुंबई येथील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या पक्षी शास्त्रज्ञांना फोनवरून ही माहिती कळविली व व्हिडीओ पाठविले. तेव्हा अशा प्रकारच्या वर्तणुकीच्या नोंद या आधी दोन वेळा करण्यात आली आहे असे कळले.
डॉ. रवी आर. पाठेकर, पक्षी निरीक्षक पालांदूर (चौ.)भंडारा