नागपूर : प्लास्टिकपासून होणाऱ्या प्रदूषणाबद्दल लोकांमध्ये जनजागृती आली आहे. त्यामुळे प्लास्टिकमुक्त वस्तू बनविण्यासाठी इको फ्रेंडली वस्तू बनविण्याचे काम दिवसेंदिवस वाढत आहे. नागपुरातील श्रेयस नंदनवार या युवा आर्किटेक्टने गव्हाच्या धांड्यापासून स्ट्रॉ बनविले आहे. जे पर्यावरणपूरक तर आहेच शिवाय शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळवून देणारे आहे.
पर्यावरणाप्रती वाढती जागरुकता लक्षात घेता, अनेक रेस्टॉरेंट व ज्यूसच्या दुकानात आता कागदापासून बनलेल्या इको फ्रेंडली स्ट्रॉचा उपयोग होत आहे. पण कागदाचा वाढता उपयोगसुद्धा पर्यावरणासाठी नुकसानदायक आहे. कारण कागद बनविण्यासाठीसुद्धा वृक्षाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. याकडे लक्ष वेधून श्रेयसने स्वत:ची कल्पकता लावून शेतीतून निघणाºया वेस्टपासून बेस्ट बनविण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी गहू काढल्यानंतर गव्हाचे धांडे जाळून टाकतात. या धांड्यावर प्रक्रिया करून श्रेयसने स्ट्रॉ तयार केले आहे. त्याचा खर्च अतिशय कमी आहे. श्रेयसने बांबूपासूनही स्ट्रॉ बनविले आहेत. विशेष म्हणजे, श्रेयस हा अहमदाबाद येथे आर्कि टेक्टची पदवी घेत असताना, हा प्रोजेक्ट अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून केला.
अशी सुचली कल्पनाश्रेयसचा स्टडी टूर सिंगापूरला गेला होता. तिथे एका रेस्टॉरेंटमध्ये त्याला कॉफीसोबत बांबूचे स्ट्रॉ दिले होते. त्यावेळी त्याच्या डोक्यात ही कल्पना आली. त्याने बांबूसोबतच गव्हाच्या धांड्यावर संशोधन केले. त्यातून या पर्यावरणपूरक स्ट्रॉची निर्मिती झाली आहे.