लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिव्यांगांचे जीवन सुकर करण्यासाठी त्यांना उपयोगी साधने व कृत्रिम अवयवांचे मोफत वितरण करणे मानवतेचे महान कार्य आहे. मानवतेचा हा निर्मळ झरा देशात अखंड वाहात राहायला पाहिजे, अशी भावना देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रविवारी नागपुरात व्यक्त केली. न्या. बोबडे यांच्या हस्ते दिव्यांगांना विविध साधने व कृत्रिम अवयवांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी आयोजकांच्या आग्रहाखातर व या मानवी उपक्रमाला प्रोत्साहन मिळण्यासाठी संक्षिप्त मार्गदर्शन केले. हा मानवतेचा समारंभ असून या ठिकाणी आपण सर्व मानवता साजरी करण्यासाठी जमलो आहोत.दिव्यांगांच्या जीवनात आनंद पेरणारा हा उपक्रम अतिशय उच्च दर्जाचा भावनिक ओलावा जपणारा आहे. या कार्यक्रमात भाषण करण्यापेक्षा कृतीला जास्त महत्त्व आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झटणारा प्रत्येक जण प्रशंसेस पात्र आहे. असे कार्यक्रम देशाची अखंडता अधिक बळकट करीत असतात असेदेखील न्या. बोबडे यांनी सांगितले.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण व भगवान महावीर विकलांग सहायता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सिव्हिल लाईन्स येथील आमदार निवास परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे, न्यायमूर्ती सुनील शुक्रे, ओडिशाचे लोकायुक्त अजित सिंग, भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे संस्थापक डॉ. डी. आर. मेहता, अध्यक्षा मधू सारडा व माजी खासदार अजय संचेती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत ७ मार्चपर्यंत ३,५०० दिव्यांगांना कॅलिपर्स, व्हीलचेअर, कुबड्या, हॅन्ड पॅडल ट्रायसिकल यासह विविध कृत्रिम अवयव नि:शुल्क प्रदान केले जातील.
मानवतेचा निर्मळ झरा देशात अखंड वाहो; शरद बोबडे यांची भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 1:10 PM
मानवतेचा निर्मळ झरा देशात अखंड वाहात राहायला पाहिजे, अशी भावना देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रविवारी नागपुरात व्यक्त केली.
ठळक मुद्देराज्यातील दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वितरण