नागपूर : मकर संक्रांत जवळ येत असताना शहरात ‘नायलॉन’ मांजाची दहशत वाढीस लागली आहे. एकीकडे मनपा प्रशासनाकडून केवळ नावापुरतीच कारवाई होत असताना नागपूर पोलिसांनी हिवाळी अधिवेशनाच्या अगोदरपासूनच ‘नायलॉन’बाजांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सद्य:स्थितीत ‘नायलॉन’चा कोट्यवधींचा माल शहरात असून, पोलिसांनी डिसेंबर महिन्यापासून २१ लाखांहून अधिकचा माल जप्त केला आहे.
विक्रीला बंदी असतानादेखील आसमंतात आपल्या पतंगाचे वर्चस्व राहावे यासाठी पतंगबाजांकडून ‘नायलॉन’ मांजाला पसंती देण्यात येते. दरवर्षी अनेक जण जखमी होतात, काहींच्या जिवावर संकट ओढवते व शेकडो पशू-पक्ष्यांनादेखील फटका बसतो. मात्र, मनपा प्रशासनाकडून माल शहरातच येऊ नये यासाठी अगोदरपासून उपाययोजना करण्यात येत नाहीत. नागपूर पोलिसांकडूनदेखील एरवी जानेवारी महिन्यात कारवाईला सुरुवात व्हायची. मात्र, या मोसमात नोव्हेंबर महिन्यात पहिली कारवाई झाली. त्यानंतर पोलिसांनी डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत नायलॉन मांजाच्या २ हजार ९८५ चकऱ्या जप्त केल्या असून, जवळपास २१ लाख ७८ हजारांचा माल जप्त केला आहे. डिसेंबर महिन्यात २१.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त झाला. जर एकूण जप्त मुद्देमालाची आकडेवारी पाहिली तर वाहने व इतर गोष्टींसह आरोपींकडून सुमारे साडेएकतीस लाखांहून अधिकचा माल जप्त झाला आहे.
- आता तरी कारवाई वाढणार का ?‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात पोलिसांनी पर्यावरण अधिनियमाअंतर्गत १३ प्रकरणांत २० जणांविरोधात गुन्हे दाखल केले. तर जानेवारीच्या पाच दिवसांत तीन जणांविरोधात गुन्हे दाखल झाले. शहरात अनेक ठिकाणी नायलॉन मांजाच्या चकऱ्यांचा साठा करण्यात आला असून त्याची विक्रीदेखील सुरू आहे. मात्र प्रशासनाकडून अद्यापही कारवाईचा वेग हवा तसा वाढलेला नाही. कमीत कमी पुढील १० दिवसांत तरी कारवाया वाढणार का असा प्रश्न उपस्थित होत आहेत.
- विक्रेत्यांसोबतच सामान्य पतंगबाजांवर कारवाई हवीमागील वर्षी ‘नायलॉन’ मांजाच्या विक्रेत्यांसोबतच प्रत्यक्ष पतंग उडविणाऱ्या अतिउत्साही नागरिकांवरदेखील कारवाई झाली होती. पोलिसांनी नायलॉन मांजा विकत घेणाऱ्यांनादेखील ताब्यात घेतले होते. आता अशा पतंगबाजांवर कारवाई कधी सुरू होणार असा सवाल उपस्थित होत आहे.
- बाहेरून वेगळे लेबल, आत चकऱ्यामुंबई, ठाणे तसेच दिल्ली, कर्नाटक, मध्यप्रदेश येथून मांजा नागपुरात आणण्यात येतो. मुंबईतून आलेल्या एका ट्रान्सपोर्ट वाहनात बाहेर वॉलपेपर असल्याचे लेबल होते. मात्र खोके उघडल्यावर त्यात हजारो चकऱ्या आढळल्या. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही या मोसमातील सर्वात मोठी कारवाई ठरली होती व २ हजार ३४० चकऱ्या जप्त करण्यात आल्या होत्या. अशा पद्धतीने बाहेरील शहरांतून चकऱ्या बोलविण्यात आल्या आहेत. बहुतांश माल मागील महिन्यातच शहरात पोहोचला आहे. शहराच्या आत गोदामांतून दुचाकी किंवा ई-रिक्षाच्या माध्यमातून यांची ने आण करण्यात येते.
- मनपा प्रशासनाला तस्करांच्या वाकुल्याकोतवाली, लकडगंज, सक्करदरा, पाचपावली, यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक कारवाया दिसून आल्या.दरम्यान, नेहमीप्रमाणे जानेवारी महिन्यात लोक जखमी होऊ लागल्यावर मनपा प्रशासनाला जाग आली व जनजागृती मोहिमांना सुरुवात झाली. मात्र, प्रत्यक्षात काही तस्करांनी मनपाच्या हद्दीत गणेशोत्सवानंतरच माल आणून ठेवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
- या मोसमात झालेल्या काही मोठ्या कारवाईपोलीस ठाणे - बंडल - किंमतकळमना - ३५ - २४,५००कोतवाली - ४२ - १८,९००लकडगंज -२,३४० - १८,२४,०००लकडगंज - १८० - ९०,०००मानकापूर - २४० - १,२०,०००नंदनवन - ३८ - २६,६००