लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : काेणतीही नैसर्गिक आपत्ती नसताना माैदा शहरातील पथदिवे शुक्रवार (दि. १९) पासून बंद आहेत. त्यामुळे तीन दिवसांपासून माैदा शहर रात्रीच्यावेळी अंधारात असते. स्थानिक नगर पंचायत प्रशासनाकडे विजेचे ९४ हजार रुपयांचे बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे ही समस्या उद्भवली आहे.
नगर पंचायत प्रशासनाच्यावतीने शहरातील नागरिकांकडून मालमत्ता, पाणी व दिवाबत्ती कराची नियमित वसुली केली जाते. मागील वर्षीपासून काेराेना संक्रमण सुरू झाले आणि काहींचे राेजगार केले तर बहुतेकांना आर्थिक अडचणी जाणवायला सुरुवात झाली. याचा नगर पंचायतच्या कर वसुली माेहिमेवरही विपरीत परिणाम झाला. त्यातच मागील तीन दिवसांपासून माैदा शहरातील सर्व पथदिवे बंद आहेत. नगर पंचायत प्रशासनाकडे विजेचे ९४ लाख रुपयांचे बिल थकीत आहे. त्या बिलाचा भरणा करण्यासाठी महावितरण कंपनीने नगर पंचायतला वारंवार सूचना दिल्या. शेवटी वीजपुरवठा खंडित करण्याची नाेटीसही बजावली.
नगर पंचायत प्रशासनाने वीजबिलाचा भरणा न केल्या महावितरण कंपनीने शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा शुक्रवारी खंडित केला. हा प्रकार पहिल्यांदाच अनुभवत असल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली. शिवाय, रात्रभर संपूर्ण शहर अंधारात राहात असल्याने शहरात वाहनचाेऱ्या व घरफाेड्या हाेण्याची शक्यताही काहींनी व्यक्त केली. काही भागात सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांची भीती बळावली आहे. त्यामुळे नगर पंचायत प्रशासनाने महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढवा, अशी मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे.
....
जवळपास २०१८ पासून वीजचे बिल बाकी आहे. नगर पंचायतची तेव्हाही ऐपत नसल्यामुळे ते बिल भरता आले नाही. ही समस्या साेडविण्यासाठी नक्कीच काहीतरी करता येईल. यावर आवश्यक उपाययोजना करून तोडगा काढला जाईल व पथदिव्यांचा खंडित वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला जाईल.
- कोमल कराळे, मुख्याधिकारी,
नगर पंचायत, मौदा.
...
नगर पंचायतकडे ९४ लाखाचे वीज बिल थकीत आहे. त्यांनी ते भरावे म्हणून वर्षभरापासून पाठपुरावा सुरू आहे. परंतु, नगर पंचायत प्रशासनाने हात वर केले. त्यामुळे आम्हाला शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करावा लागला.
- रूपेश टेंभुर्णे, कार्यकारी अभियंता,
महावितरण कंपनी, मौदा.