नागपूर : भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये तेलाचे खूप जास्त महत्त्व आहे. परंतु तेलामध्ये एकदा कोणताही पदार्थ तळला आणि त्यानंतर त्याच उरलेल्या तेलात दुसरे पदार्थ बनवले गेले तर ते आरोग्याला अपायकारक ठरतात. हॉटेलचालकांकडून असे केल्यास अन्न व औषध प्रशासनातर्फे कारवाई केली जाते,परंतु नागपुरात या कारवाईला गंभीरतेने घेत नसल्याचे चित्र आहे. नागरिकांवर रस्त्यावरील व हॉटेल्समधून विकत घेणाऱ्या खाद्यपदार्थांमधून विकतचा आजार मिळत आहे.
-वर्षभरात एकावरही कारवाई नाही
ज्या अन्न व्यावसायिकांचा खाद्य तेलाचा वापर प्रतिदिवस ५० लिटरपेक्षा अधिक आहे, अशा व्यावसायिकांसाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत नियम आहेत. त्यानुसार संबंधितांनी तेलाचे रेकॉर्ड ठेवणे आवश्यक आहे. ‘एफडीए’कडून वारंवार हॉटेल्सची तपासणी केली जाते, परंतु वर्षभरात एकावरही कारवाई झालेली नाही.
-तर होऊ शकतात हे आजार
डॉक्टरांनुसार, एकदा वापरलेल्या तेलाचा पुन्हा वापर केल्यास अशा तेलात ‘फ्री रेडिकल्स’ तयार होतात. हे ‘रेडिकल्स’ आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. वापरलेले तेल पुन्हा वापरल्याने ‘ॲथेरोस्कॉलरोसिस’ होऊ शकतो. ज्यामुळे आपल्या शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढून हृदयाच्या धमन्या ब्लॉक होण्याचाही धोका असतो.
-तेलसाठ्याची नोंद ठेवतो कोण?
अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत मोठ्या अन्न व्यावसायिकांनी ते दररोज वापरत असणाऱ्या तेलाची नोंद ठेवणे आवश्यक असते. तसेच वापरुन किती तेल शिल्लक राहिले, तसेच उरलेल्या तेलाची विल्हेवाट कशी लावली किंवा शिल्लक तेल हे कोणत्या नोंदणीकृत बायोडिझेल उत्पादकाला दिले त्यासंबंधी पूर्ण नोंदी ठेवणे आवश्यक असते. तसे न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. परंतु ही नोंद ठेवते कोण? आणि गंभीरतेने तपासते कोण? हा प्रश्न आहे.
-तेलातील टीपीसी हे २५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास कारवाई
तळण्यासाठीच्या खाद्यतेलाच्या पुनर्वापरावर निर्बंध घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या जिल्हा कार्यालयामार्फत संबंधित अन्न व्यावसायिकांकडे जाऊन तपासणी केली जाते. ‘टीपीसी मीटर’च्या मदतीने तळण्यासाठी वापरत असलेल्या तेलाची तपासणी केली जाते. जर तेलातील ‘टीपीसी’ हे २५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर अन्न व्यावसायिक पुढील कायदेशीर कारवाईस पात्र ठरतात. अधिक माहितीसाठी अन्न व औषध प्रशासनाचे अभय देशपांडे यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तो बंद होता.