लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अडीच महिन्यापासून सुरू असलेल्या टाळेबंदीत शिथिलता येताच रस्त्यावर नागरिकांची वर्दळ वाढली आहे. हे बघून शहरातील भिक्षेकरीही सक्रिय झाले असून भीक मागण्यासाठी पुन्हा गजबज वाढू लागली आहे. मात्र यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे नागरिकांची गर्दीही रस्त्यावर कमी झाली आणि त्याचप्रमाणे नेहमी भिक्षेसाठी पुढे येणारे हातही रस्त्यांवरून गायब झाले. आता टाळेबंदीत शिथिलता दिल्यामुळे हळूहळू सर्व व्यवहार पूर्ववत होत चालले आहेत. गेल्या अडीच महिन्याहून अधिक काळापासून आपल्या निवाऱ्यात बसून असणारे भिक्षेकरू पुन्हा रस्त्यांवर सक्रिय झाले. स्वत:च्या पाल्याला कडेवर घेऊन या भिक्षेकरू स्त्रिया इतर नागरिकांकडून पैसे देण्यासाठी विनवणी करताना दिसत आहेत. एखाद्या व्यक्तीच्या अंगाला हात लावून हे भिक्षेकरू भीक मागत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भौतिक दूरता राखणे गरजेचे आहे. पण हे भिक्षेकरू चौकातील दुचाकी व चारचाकी वाहनांपुढे येऊन उभे होतात. काही पैसे द्या, अशी याचना करीत दुचाकीस्वाराच्या पाया पडतात, चारचाकी वाहनांच्या खिडक्यांवर हात ठेवून जोवर खिडकीचा काच खाली होत नाही तोपर्यंत ठकठक करत असतात. त्यामुळे भीतीपोटी का होईना नागरिक लगेच आपल्या खिशात हात घालतात आणि हाती लागतील तेवढे पैसे देऊन टाकतात. मध्यंतरी कोरोनामुळे एका भिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिक या भिक्षेकरूंनपासून सावध राहण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. टाळेबंदीच्या दरम्यान अनेक समाजसेवी संस्थानी या भिक्षेकरूंना त्यांच्या निवाऱ्यात जाऊन धान्याची मदत केली. अन्नाचा पुरवठा केला आणि अनेकांकडे किटदेखील पोहचल्या आहेत. त्यामुळे आजच्या घडीला कुणी भिकारी उपाशी किंवा धान्यापासून वंचित असल्याचे दिसत नाही. तरीही हे भिक्षेकरू रस्त्यावर मास्क परिधान न करता बिनधास्त फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. प्रशासनाने यासंदर्भात कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.
नागपुरात रस्त्यावर वाढली भिक्षेकरूंची वर्दळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 9:38 PM
अडीच महिन्यापासून सुरू असलेल्या टाळेबंदीत शिथिलता येताच रस्त्यावर नागरिकांची वर्दळ वाढली आहे. हे बघून शहरातील भिक्षेकरीही सक्रिय झाले असून भीक मागण्यासाठी पुन्हा गजबज वाढू लागली आहे. मात्र यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.
ठळक मुद्देटाळेबंदीत शिथिलता देताच गजबज : कोरोना संसर्ग वाढण्याची भीती