नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रोजगार व प्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून आयोजित रोजगार मेळाव्यात टीसीएस कंपनीने १३६ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. यामध्ये टीसीएस मिहान येथील ११३ तर भंडारा येथील रोजगार मेळाव्यात निवड झालेल्या २३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विद्यापीठाच्या रोजगार व प्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून टीसीएस कंपनीकडून मिहान येथे तर भंडारा येथील जे. एम. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रोजगार मेळावा आयोजित केला होता. नागपूर येथील मेळाव्याला ५१२ विद्यार्थी उपस्थित होते. यात लेखी परीक्षेनंतर ११३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. भंडारा येथील मेळाव्याला २५० विद्यार्थी उपस्थित होते. यातून २३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठात रोजगार व प्रशिक्षण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून विद्यापीठातील विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण होताच विद्यार्थ्यांना मेळाव्यातून रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
टीसीएस मिहानकडून बीपीएस ग्रॅज्युएट पदाकरिता हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरिता २०२१, २०२२ व २०२३ मध्ये बी. ए., बी. कॉम., बीएएफ, बीबीआय, बीबीए, बीबीएम, बीएमएस, बी. एस्सी. (सीएस/आयटी वगळता) आदी पदवीचे शिक्षण आवश्यक होते.