लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजप सरकारच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या समता प्रतिष्ठानचा कारभार पुन्हा एकदा जोमाने सुरू होणार आहे. यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेतला आहे. सरकारने प्रतिष्ठानसाठी एकूण १० नवीन पदांना नुकतीच मंजुरी प्रदान केली आहे.
नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर फाउंडेशनच्या धर्तीवर राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. मागील भाजप सरकारच्या काळात या प्रतिष्ठानची स्थापना झाली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्यात वर्षभर कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमावर झालेल्या खर्चात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला. पुढेे चौकशी झाली. गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आल्याने समता प्रतिष्ठानमधील सर्व अधिकारी-कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले होते. सामाजिक न्याय भवनातील समता प्रतिष्ठानचे कार्यालय मागील एप्रिल महिन्यापासून केवळ नावालाच सुरू होते. केवळ एका अधिकाऱ्याच्या भरवशावर कार्यालय चालविले जात होते. मुळात काम काहीच होत नव्हते. केवळ नावालाच कार्यालय सुरू होते.
सरकारने नुकतीच प्रतिष्ठानसाठी एकूण १० नवीन पदांना मंजुरी दिली आहे. यात चार नियमित, तर सहा बाह्यस्रोतांद्वारे भरावयाची आहेत. याची कार्यवाही अजून सुरू झाली नसली तरी प्रतिष्ठानचा कारभार पुन्हा एकदा जोमाने सुरू होईल, याची शक्यता बळावली आहे.
बार्टीबाबतही निर्णय घ्यावा
समता प्रतिष्ठानप्रमाणेच नागपुरातील बार्टीच्या विभागीय कार्यालयाचीही दूरवस्था आहे. हे कार्यालयसुद्धा केवळ एका अधिकाऱ्याच्या भरवशावर सुरू आहे. बार्टीच्या योजना खऱ्या अर्थाने विदर्भातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर नागपुरातील विभागीय कार्यालयालासुद्धा सरकारने बळ देण्याची गरज आहे.