राहुल लखपती
नागपूर : प्रत्येक संकटामध्ये संधी उपलब्ध राहते. परंतु, गरज असते, ती संधी शोधून त्यानुसार कृती करण्याची. शहरातील तीन तरुणांनी अशाच संधीचे सोने केले. त्यांनी गृहव्यवसायाला उभारी देण्यासाठी लोग्रो टेक्नॉलॉजीज एलएलपी फर्मची स्थापन केली. या फर्मच्या माध्यमातून गृह उत्पादने बाजारातील योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचविली जात आहेत. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे समाज परिवर्तनाला बळ मिळाले आहे.
फर्मचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित मंगरुळकर यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन लागू झाल्यानंतर प्रत्येकाला पुढे काय करायचे, हा प्रश्न पडला होता. कोरोना झपाट्याने पसरत होता. त्यामुळे अनेक जण संकटात सापडले. या परिस्थितीत स्थानिक गृहव्यवसायांना मदत करण्याचा विचार मनात आला. त्यातून या फर्मची स्थापना करण्यात आली. फर्मच्या दुसऱ्या सह-संस्थापकाचे नाव विवेक पवार (तांत्रिक प्रमुख) आहे. तिसऱ्या सह-संस्थापकाने नाव उघड करण्यास मनाई केली. ते बेंगळुरू येथे आयटी व्यावसायिक आहेत. याशिवाय मार्केटिंग व इतर कामासाठी काही सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या फर्मची गेल्या सप्टेंबरमध्ये सुरुवात करण्यात आली. फर्मला स्टार्टअप इंडियाची २ फेब्रुवारी २०२१ रोजी मान्यता मिळाली. मान्यता प्रमाणपत्र मिळविणे फार कठीण गेले. त्यासाठी अधिकाऱ्यांकडे दीर्घकाळ पाठपुरावा करावा लागला. फर्मशी सध्या २५ व्यावसायिक जुळले आहेत. त्यात गृहसजावटीच्या वस्तू, खाद्यपदार्थ, कलाकुसर, पूजा साहित्य इत्यादी वस्तूंच्या व्यावसायिकांचा समावेश आहे. त्यांच्या व्यवसायाचे वेबसाईट व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नियोजन केले जात आहे. याशिवाय फर्मकडे आणखी ७५ व्यावसायिक असून, त्यांच्याकरिता ॲप विकसित केले जाणार आहे. ॲपची येत्या मार्चमध्ये चाचणी आहे.
----------
केवळ ७५ हजार रुपयात सुरुवात
या फर्मची केवळ ७५ हजार रुपये गुंतवणुकीतून सुरुवात झाली. आता त्यांना शहरातून बाहेर पडून देशपातळीवर पोहोचायचे आहे. त्याकरिता अधिक गुंतवणूक केली जाणार आहे. जास्तीतजास्त गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी फर्मची व्यापक जाहिरात केली जाणार आहे.
------------------
केवळ पाच महिन्यात मान्यता
वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत उद्योग व अंतर्गत व्यापार प्रसिद्धी विभागाने या फर्मला केवळ पाच महिन्यात मान्यता दिली. ही मोठी उपलब्धी आहे. याशिवाय, लॉकडाऊनमध्ये अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिल्यामुळे या फर्मला महानगरपालिकेच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.