लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अर्थसंकल्पात वन विभागाला निधी मागण्याची गरज भासु नये यासाठी वन विभागात उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना करून वन खात्याचे सबलीकरण करण्यात येणार असून आगीवर नियंत्रणासाठी सर्वेतोपरी प्रयत्न करून वन्यजीवांचे संवर्धन करण्यावर भर देण्यात येईल, अशी ग्वाही वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली.
वन विभागाच्या दोन दिवसीय बैठकीसाठी नागपुरात आल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी सेमिनरी हिल्स येथील हरिसींग सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, वन खात्याला आर्थिक बळ कसे मिळेल याबाबत नोट तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सिझनल आणि रिजनल फळांच्या ज्युसमधून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यात कोकणात आंब्याचे, पश्चिम महाराष्ट्रात दाळींब, द्राक्षाचे ज्युस, मराठवाड्यात मोसंबी, विदर्भात संत्र्याचे ज्युस तयार करण्याचा विचार आहे. तसेच वन विभागाच्या ७०० नर्सरीत जांभुळ, फणस, आंबा आदींची झाडे लावण्यात येतील. तसेच कोकणातील सुरंगी फुलांचा गजरा खुप प्रसिद्ध असून सुरंगीची झाडे समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात येतील. पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या सुविधेसाठी प्रत्येक गेटचे सुशोभिकरण, रेस्टॉरंट, शुद्ध पाणी, फाईव्ह स्टार हॉटेल आदींना परवानगी देण्याचा मानस असून वनखाते जनताभिमुख करण्यात येईल. चंद्रपूरमध्ये १० एकर जमिनीवर आधुनिक फर्निचर तयार व्हावे या माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रस्तावासाठी दर महिन्याला १० कोटी रुपये या प्रमाणे ७ महिन्यात ७० कोटी रुपये कॅम्पातून देण्यात येऊन असा प्रकल्प प्रत्येक प्रादेशिक विभागात उभारण्यात येईल. तसेच नाशिक आणि ठाणे येथील वन विकास महामंडळाच्या ६० हजार एकर जागेवर सोलर पार्क तयार करून वीज उत्पादन करण्यात येणार असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अप्पर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) शोमिता बिश्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास राव, वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड, प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन) विवेक खांडेकर आदी उपस्थित होते.
आगीवर नियंत्रणासाठी अधिकारी देणार विदेशात भेटीवनमंत्री म्हणाले, जंगलाला आग लागणे ही केवळ भारतातच घडणारी घटना नसून अनेक देशात जंगलात आगी लागून हजारो हेक्टर वन आगीच्या भक्ष्यस्थानी पडते. परंतु अनेक देशांनी आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविले आहे. भविष्यात वन विभागातील अधिकारी संबंधीत देशांना भेटी देऊन त्यांनी आगीवर कसे नियंत्रण मिळविले याबाबतचे तंत्र आत्मसात करतील. यासोबतच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हेलिकॉप्टर, चॉपर, आग विझविणारे ड्रोन खरेदी करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वाघांना कोअर एरीयात बिझी करणार२००२ मध्ये महाराष्ट्रात वाघांची संघ्या १०३ होती. २०२५ मध्ये राज्यात ४४३ वाघ झाले आहेत. बफर झोनमध्ये अधिक वाघ झाले असून हे वाघ गावात येत असल्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढीस लागला आहे. परंतु कोअर झोनमध्ये शाकाहारी प्राण्यांसाठी बोरं, आंबा, फणस अशा शाकाहारी फळांची झाडे लावण्यात येतील. त्यामुळे शाकाहारी प्राणी तिकडे जातील आणि ते मासाहारी प्राण्यांची भूक भागवतील, अशी योजना असून वाघांना कोअर एरीयात बिझी ठेवण्याचा प्रयत्न करणार असून वाघांना एक्स्पोर्ट करण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले.
ठाण्यात शोधली सुर्यतारासाठी जमीनवनमंत्री म्हणाले, आम्ही वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ५ मार्च २०२५ रोजी गुजरातच्या जामनगरमध्ये वनतारा या खाजगी प्राणी संग्रहालयाला भेट दिली. तेथे २५० वाघ, २०० बिबट, शहामृग, गेंडे असे एकूण १ लाख ५० हजार वन्यप्राणी आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुर्यतारा प्राणी संग्रहालय सुरु करण्याचा मानस असून त्यासाठी ठाणे जिल्ह्यात जागा शोधून अनंत अंबानींना पत्र देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.