योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्यांसमोर अभ्यासासोबतच कौशल्यविकासाचादेखील ताण असतो. अनेकांना योग्य मार्गदर्शनाअभावी निराशेचा सामना करता येत नाही व ते नको तो निर्णय घेऊन बसतात. मात्र मनातील ताणतणाव दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना फारसे दूर जावे लागणार नाही. विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षण न देता आता महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना जगण्याचे धडेदेखील द्यावे लागणार आहे. विद्यार्थ्यांमधील निराशा दूर करण्यासाठी प्रत्येक व्यावसायिक महाविद्यालयात ‘समुपदेशन सेल’ अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याची जबाबदारी महाविद्यालयांकडे राहणार आहे हे विशेष.व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांसमोर आव्हानांचा ताण असतो. भविष्यातील संधी, ‘प्रोजेक्ट’ पूर्ण करण्याची धावपळ, अभ्यासाचे ओझे यांच्या विचाराने अनेक विद्यार्थी प्रचंड तणावाने ग्रस्त असतात. तीव्र स्पर्धात्मक युगामुळे ही निराशेची भावना टोकाला पोहोचते अन् त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या एकूणच जडणघडणीवर होतो. हीच बाब लक्षात घेऊन ‘डीटीई’तर्फे (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) पुढाकार घेण्यात आला आहे. ‘डीटीई’ने व्यावसायिक अभ्यासक्रम संचालित करणाऱ्या सर्व महाविद्यालयांना ‘समुपदेशन सेल’ स्थापन करण्याचे निर्देशच दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्याशी योग्य संवाद साधावा व विद्यार्थ्यांना योग्य सूचना द्याव्या, अशी सूचनादेखील देण्यात आली आहे.
मानसिक आरोग्य जपावे लागणारनागपूर विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून याबाबत महाविद्यालयांना सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य निरोगी कसे राहील, याबाबत महाविद्यालयांना पावले उचलावी लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी सांघिक चर्चासत्रे, मार्गदर्शनपर व स्फूर्ती देणारी व्याख्याने, उद्योजकता वाढविणारी शिबिरे नियमितपणे आयोजित करावी लागणार आहेत. विशेष म्हणजे महाविद्यालयांना याचा नियमितपणे विभागीय सहसंचालकांना दर महिन्याच्या ३० तारखेला अहवाल सादर करावा लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.