नागपूर : पाच रुपये असलेले प्लॅटफार्म तिकीट १ एप्रिलपासून १० रुपये घेण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतल्यामुळे आता १ एप्रिलपासून आपल्या नातेवाईकांना निरोप देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना १० रुपये मोजण्याची पाळी येणार आहे.रेल्वेस्थानकात प्रवेश करण्यासाठी प्लॅटफार्म तिकीट खरेदी करणे आवश्यक आहे. विना प्लॅटफार्म तिकीट रेल्वेस्थानक परिसरात प्रवेश करणे हा रेल्वे अॅक्ट १४७ नुसार गुन्हा आहे. विना प्लॅटफार्म तिकीट आढळलेला प्रवासी विनातिकीट म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. त्यासाठी १ हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. दंड न भरल्यास रेल्वे न्यायालयाकडून सहा महिन्यापर्यंत तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज ६ हजार २०८ प्लॅटफार्म तिकीटची विक्री होते. दररोज रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म तिकीटाच्या माध्यमातून ३० हजार रुपये गोळा होतात तर वर्षाकाठी नागपूर रेल्वेस्थानकावर १ कोटी ८ लाख रुपयांच्या प्लॅटफार्म तिकीटांची विक्री होते. आत ५ रुपयांचे प्लॅटफार्म तिकीट १० रुपयांना करण्याचा निर्णय घेतल्यामुळे रेल्वेचा महसूल १ कोटी ८ लाखाने वाढणार आहे. परंतु याचा थेट फटका नागरिकांना बसणार असून नातेवाईकांना सोडण्यासाठी रेल्वेस्थानकावर आलेल्या नागरिकांना आत प्रवेश करावा की नाही, याचा विचार करावा लागणार आहे. दोन वर्षापूर्वी ३ रुपयांना मिळणारे प्लॅटफार्म तिकीट ५ रुपये करण्यात आले. आता प्लॅटफार्म तिकिटाची किंमत दुप्पट केल्यामुळे नागरिकांच्या खिशावर ताण पडणार आहे. (प्रतिनिधी)
नागरिकांच्या खिशाला पडणार ताण
By admin | Published: March 19, 2015 2:35 AM