लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांच्या जान-मालाच्या सुरक्षेला आपले सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून नागपूर तसे पाहता शांत आहे. येथील पोलिसांची इमेजही खूप छान आहे. आतापर्यंतच्या अधिकाऱ्यांनी नागपुरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्याचे जे प्रयत्न केले ते अनुकरणीय आणि प्रशंसनीय आहेत. यापुढेही कुणी कायदा हातात घेऊ पाहत असेल तर त्याची कोणत्याच किमतीत गय केली जाणार नाही, असा इशारा नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.
पोलीस आयुक्तालयात पत्रकारांशी त्यांनी शुक्रवारी सायंकाळी अनौपचारिक चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, १३ वर्षांनंतर आपण पुन्हा नागपुरात कर्तव्य बजावण्यासाठी आलो आहे. या आधीच्या आपल्या सर्व वरिष्ठ सहकाºयांनी नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेची घडी अत्यंत व्यवस्थित बसविली आहे. नागपूरकर जनता नेहमीच पोलिसांना सहकार्य करते, हा आपला यापूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे जनतेचे सहकार्य मिळवून नागपूर पोलिसांची प्रतिमा आदर्श कशी ठरेल, याकडे आपण कटाक्षाने लक्ष देणार आहोत. हद्दपारी, एमपीडी, मकोका सारखे कायद्याचे कठोर शस्त्र उगारून आपण येथील गुन्हेगारी मोडून काढू. शहरातील वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष देऊ आणि अपघातमुक्त शहर कसे होईल याकडे कटाक्ष ठेवू ,असेही त्यांनी सांगितले. गुन्हेगार आणि येथील पोलिसिंग या दृष्टिकोनातून नागपूरला एक आदर्श शहर बनविण्यासाठी आपले कसोशीने प्रयत्न राहणार आहेत. किती दिवसात काय करणार हे मी आत्ता सांगणार नाही. मात्र तुम्हाला त्याचे परिणाम लवकरच दिसून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.गंभीर प्रकरणांचा छडा लावूमहापौर गोळीबार प्रकरण, राणे प्रकरण, सुजल वासनिक अपहरण तसेच शहरातील आतापर्यंत अनेक प्रकरणे उलगडण्यात पोलिसांना यश आले नाही, त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर बोलताना आपण सर्वच प्रकरणांचा छडा लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू आणि त्यात यशही मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरातील कोरोनाची स्थिती आणि पोलिस या संबंधाने प्रश्न उपस्थित झाले असता त्यांनी खबरदारीच्या सर्व उपाययोजना राबवू, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मदतीने कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.मी कधीही उपलब्ध!नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांचा कायद्याचा हक्क अबाधित राखण्यासाठी मी कोणत्याही वेळेला उपलब्ध राहीन, अशी हमी अमितेश कुमार यांनी दिली.