भंडारा : घरगुती वादातून माहेरी एकटी निघालेल्या गोरेगाव तालुक्यातील (जि. गोंदिया) एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिला शेतात निर्वस्त्र अवस्थेत सोडून दिले होते. भंडारा तालुक्यातील कान्हळमोह येथे घडलेल्या या प्रकाराने समाजमन अस्वस्थ होऊन आरोपींविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे.
त्यातच या प्रकरणाची दखल घेत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना निर्देश दिले.
भंडारा शहरापासून १० किमी अंतरावर कान्हळमोह शिवारात मंगळवार, २ ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. पीडितेला नागपूरच्या नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
दिल्लीतील 'निर्भया' प्रकरणासारखीच ही घटना असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. पूर्व विदर्भ महिला संपर्कप्रमुख व विभागीय प्रवक्ता शिल्पा बोडखे, शिवसेना नागपूरच्या महिला आघाडी पदाधिकाऱ्यांसमवेत जाऊन त्यांनी तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तिच्या प्रकृतीची विचारपूस करून कुटुंबीयांना धीर दिला. गपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता दूरध्वनीवरून पीडितेच्या प्रकृतीची चौकशी केली. उपचारासाठी शासकीय स्तरावर सर्व काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही दिली.
भंडाऱ्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनीही या घटनेबद्दल अधिक गतीने तपास करून योग्य ती कार्यवाही व्हावी, याबाबत पावले उचलली आहेत. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोर्जे यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत.