परभणीत संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
By कमलेश वानखेडे | Published: December 11, 2024 04:16 PM2024-12-11T16:16:00+5:302024-12-11T16:17:45+5:30
विजय वडेट्टीवार : हे अधिवेशन फक्त विधेयके मंजुरीसाठी
कमलेश वानखेडे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परभणी शहरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यामुळ तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. सदर घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन आणि पोलीस दलाने तात्काळ योग्य कारवाई करायला हवी होती. मात्र ते न झाल्यामुळे आज परिस्थिती चिघळली आहे. पोलिसांनी संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. तसेच सरकारने जनतेला अश्वासित करावे, की या प्रकरणात कोणतीही हयगय केली जाणार नाही, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी नागपुरात केली. संविधान प्रेमी जनतेने देखील शांतता आणि संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
वडेट्टीवार म्हणाले, हिवाळी अधिवेशन हे फक्त विविध विधेयके मंजूर करण्यासाठी आहे. उत्तर द्यायला कुणी मंत्री नाही. लक्षवेधी येईल आणि सत्ताधारी विरोधकांचा प्रस्ताव होईल. कामकाज सल्लागार समितीची स्थापना झाली आहे. अधिवेशन किमान १० दिवसांचे तरी असानवे, अशी मागणी आम्ही सरकारच्या कानावर पोहचवू, असेही त्यांनी सांगितले. कुणाला मंत्रीपद द्यायचे हा महायुतीचा आंतरिक प्रश्न आहे. भाजपकडे १३७ आमदार आहेत. त्यामळे एकनाथ शिंदे असोत की अजित पवार, हे दिल्लीच्या हायकमांडशिवाय हलणार पण नाही, दयेचा अर्ज करूनच काही मिळवावे लागेल, अशी कोंडी निकालाने केली आहे, असा चिमटा वडेट्टीवार यांनी घेतला.
फडणवीस तयार असतील तरच विरोधी पक्षनेत्याचे नाव देऊ
आम्ही गटनेता निवडण्याचा प्रस्ताव दिल्लीकडे पाठवलेला आहे. त्यावर दिल्लीत निर्णय घेईल. या आठवड्यात चर्चा करून नाव येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधीपक्ष नेता पद द्यायला तयार आहे का, हे त्यांना विचारून नंतर आम्ही एक नाव ठरवून देऊ. विरोधीपक्ष नेता देणारच नसेल तर आम्ही नाव देणार नाही, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
बॅलेटवरच निवडणुका व्हाव्यात
ईव्हीएममध्ये घोळ असल्याची लोकांना शंका व विश्वासही आहे. या विरोधात याचिका दाखल करण्यासाठी नेत्यांची चर्चा सुरू आहे. जगात भारत एकमेव देश आहे तो ईव्हीएमवर निवडनूक घेतो. त्यामुळे आपण विश्वास कसा दाखवायचा. या पुढे निवडणुका बॅलेटवर झाली पाहिजे, मागणीही त्यांनी केली.