नागपूर : शहरातील सामाजिक सलोखा कुणी बिघडवण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा खणखणीत इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी दिला. शहर पोलीस पूर्णपणे हाय अलर्ट मोडवर असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.
अजान, भोंगे अन् हनुमान चालिसा तसेच महाआरतीच्या संबंधाने सध्या वातावरण गरम झाले आहे. या संबंधाने ४ मे पासून राज्यातील ठिकठिकाणचे सामाजिक वातावरण दूषित होऊ शकते,असा इशारा गुप्तचर खात्याकडून मिळाला आहे. जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही कळविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनीही कंबर कसली असून सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी रात्री यासंबंधाने पत्रकारांसोबत चर्चा केली. ते म्हणाले,
सामाजिक सलोखा बिघडेल, अशा कोणत्याही कार्यक्रमाला पोलिसांकडून परवानगी मिळणार नाही. कुणी जबरदस्तीने किंवा लपून छपून महाआरती अथवा कोणताही कार्यक्रम करण्याचे प्रयत्न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. आमची सर्व पक्षाच्या व्यक्ती समुदायाच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. सर्वांनीच सहकार्याचे आश्वासन दिल्याने कोणतीही गडबड होणार नाही, याचा विश्वास आहे. तरीसुद्धा शहरातील सर्व पोलीस स्टेशन, त्यांच्या सोबत दीड ते दोन हजार पोलीस, ६०० होमगार्ड आणि एसआरपीची कंपनी बंदोबस्तात तैनात राहणार आहे. परिस्थितीनुसार टप्प्याटप्प्याने बंदोबस्त ५ ते ६ हजारांचा करू, गरज पडल्यास बाहेरूनही संख्याबळ मागवू, मात्र जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांना अद्दल घडवू,असेही पोलीस आयुक्त म्हणाले.
नोटीस, प्रतिबंधक कारवाई
नोटीसचा प्रश्न उपस्थित केला असता, कुण्या विशिष्ट पक्षाच्या नेत्या-कार्यकर्त्यांना आम्ही टार्गेट केलेले नाही. मात्र, आमची संबंधितांवर सूक्ष्म नजर आहे. त्यामुळे गेल्या काही तासात ६३९ जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असून, १४९ नुसार, २९३ जणांना तर ११०, १०७ नुसार हजार पेक्षा जास्त जणांना नोटीस देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील धार्मिक, प्रार्थना स्थळे
शहरात २३९ मशिदी, १२०४ मंदिर आणि ४०० बाैद्धविहार आहेत. भोंग्याचा अथवा लाऊडस्पिकरचा मुद्दा कुण्या एकासाठी नव्हे तर कायद्यानुसार सर्वांसाठीच सारखा राहिल, असेही पोलीस आयुक्तांनी एका प्रश्नाच्या संबंधाने स्पष्ट केले.