लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे कोरोनासंदर्भात जारी मार्गदर्शिकेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात यावे अशा विनंतीसह अॅड. अनुप गिल्डा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने शुक्रवारी हा अर्ज रेकॉर्डवर घेऊन पुढील कार्यवाहीसाठी २६ मे रोजी सुनावणी निश्चित केली.प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित असून त्यात अॅड. गिल्डा न्यायालय मित्र आहेत. मार्गदर्शिकेनुसार, डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रुग्णांना हाताळताना एन-९५ मास्क व हॅण्ड ग्लोव्ह्ज वापरणे अनिवार्य आहे. परंतु, मेडिकलमधील डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी पार्वतीनगर येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला हाताळताना हॅण्ड ग्लोव्ह्ज वापरले नव्हते. परिणामी, डॉक्टरांसह एकूण १० जणांना क्वारंटाईन करावे लागले. ही बाब लक्षात घेता मार्गदर्शिकेचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे, याकडे अॅड. गिल्डा यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.याशिवाय त्यांनी एम्समधील सेंट्रल रॅपिड रिस्पॉन्स पथकाने यवतमाळला भेट दिल्यानंतर केलेल्या विविध शिफारशींवर अंमलबजावणी करण्याची मागणी केली. त्यात यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आॅपरेशन थेटर व लेबर रूम उभारणे, कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित करणे, कोरोना हेल्पलाईन सुरू करणे, विलगीकरण कक्षातील रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, प्रतिबंधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक व गर्भवती महिलांची नियमित तपासणी करणे इत्यादी शिफारशींचा समावेश आहे.
कोरोना मार्गदर्शिकेचे काटेकोर पालन करा : हायकोर्टात अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 8:50 PM
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे कोरोनासंदर्भात जारी मार्गदर्शिकेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात यावे अशा विनंतीसह अॅड. अनुप गिल्डा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.
ठळक मुद्देमेडिकल डॉक्टरांनी केला निष्काळजीपणा