जिल्हा प्रशासनाने दिले आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रुग्णसंख्येत गेल्या दोन दिवसांपेक्षा कमी वाढ असली तरी जिल्हा प्रशासनाने तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याला लक्षात घेता मास्क घालणे, सुरक्षित अंतर राखणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे या कोविड प्रोटोकॉलची पुन्हा कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आता मास्क न घालता रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करतील.
रस्त्यावरची गर्दी कमी ठेवणे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्वात आवश्यक असून मास्क न घालता रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करा, असे निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे. नागरिकांनी कोरोना गेला असे समजून वागू नये. कोविड प्रोटोकॉल पाळावा, मास्क लावणे, गर्दी कमी करणे, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडणे, याकडे लक्ष वेधणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोविड काळात या प्रोटोकॉलची अंमलबजावणी झाली. परंतु कोरोनाचा संसर्ग कमी होताच लोक बिनधास्त झाले आहेत. मास्क न घालता वावरू लागले आहेत. परिणामी पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. हा संसर्ग आणखी वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा प्रोटोकॉलची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. -
- बॉक्स
- ऑक्सिजन उपलब्धतेबाबत आढावाही घेतला
दुसऱ्या, एका बैठकीमध्ये ऑक्सिजन उपलब्धतेसंदर्भात चर्चा करण्यात आली. मेयो, मेडिकल यासोबतच ग्रामीण भागात ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागला तर सर्व यंत्रणा प्रशिक्षित करणे, वाहन व्यवस्था व अन्य तांत्रिक बाबींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर यांच्या नेतृत्वातील चमू उपस्थित होती.