लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - प्रतिबंधक लस घेऊनही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी विना मास्कने फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी १,४९३ जणांवर अशा प्रकारे कारवाई करण्यात आली असून, रविवारपासून ही कारवाईची मोहीम तीव्र केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकारांना दिली आहे.
गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाली असून, दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे. लग्न समारंभ, कार्यक्रमात होणारी गर्दीमुळे कोरोना वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, सुरक्षित अंतर पाळावे, मास्क लावावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र, त्याला प्रतिसाद देण्याऐवजी हलगर्जीपणा दाखवला जात आहे. साधे मास्क लावण्याचेही टाळले जात आहे. यामुळे कोरोनाचा झपाट्याने संसर्ग होऊ शकतो, हे ध्यानात आल्याने पोलिसांनी कारवाईची धडक मोहीम राबविणे सुरू केले आहे. त्यानुसार, शुक्रवारी विना मास्कने फिरणाऱ्या ५५५ तर सुरक्षित अंतर न पाळणाऱ्या १०३ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. शनिवारी हा आकडा अनुक्रमे ७४७ आणि ७८ एवढा आहे. विविध भागात नाकेबंदी करून कारवाईची मोहीम तीव्र केली जाणार आहे. सोबतच विविध मंगल कार्यालये, लॉन्स, सभागृह, हॉटेल आणि बारवरही पोलिसांनी नजर रोखली असून रोज आकस्मिक पाहणी करून तेथे गर्दी आढळल्यास संबंधित संचालकावर कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त जणांची तर बार रेस्टॉरेंट, हॉटेलमध्ये एकूण क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंतच उपस्थिती ग्राह्य मानली जाईल. अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त नागरिकांनी हजेरी लावू नये, असेही सांगण्यात आले आहे.
---
सक्षम उपाययोजना
गेल्या वर्षी १,६४० पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. आता पुन्हा ६७ पोलीस कोरोनाग्रस्त झाले आहेत. आतापर्यंत १,९९३ पोलिसांनी कोरोना वॅक्सिन घेतली आहे. बाधा होऊ नये आणि झाली तरी कुणाचाही जीव जाणार नाही, यासाठी औषधोपचारापासून तो हॉस्पिटलपर्यंतच्या सर्व उपाययोजना पोलिसांनी करून ठेवल्या आहेत. आणीबाणीची वेळ आल्यास तीन तासात पोलिसांचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात येईल, असे अमितेशकुमार यांनी आज सांगितले. पोलिसांच्या कोविड टेस्टसाठी प्रत्येक ठाण्यात शिबिर घेतले जाणार असल्याचेही ते पत्रकारांशी चर्चा करताना बोलले.
---आरोपीची आधीच टेस्ट
कारवाईच्या निमित्ताने पोलीस कोरोनाबाधित आरोपीच्या संपर्कात येऊ शकतात, हा धोका लक्षात घेत पोलिसांना
प्रत्येक झोनमध्ये रॅपिड ॲंटीजेन टेस्ट किट उपलब्ध करून दिली जाणार आहे. आरोपीला ताब्यात घेतल्याबरोबर त्याची टेस्ट केली जाणार असून तो पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला १४ दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाणार आहे.
---