नागपूर - उपराजधानीतील सामाजिक साैहार्द बिघडवू पाहणाऱ्या विषयाच्या अनुषंगाने काही सामाजिक संघटना मोर्चा काढणार असल्याची माहिती गिट्टीखदान पोलिसांना मिळाली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी गिट्टीखदानमध्ये जोरदार बंदोबस्त लावला. मोठ्या संख्येत सुरक्षा बलही तैनात करण्यात आले, मात्र मोर्चा निघालाच नाही.
गिट्टीखदानमधील एका समाजकंटकाचा अत्यंत आक्षेपार्ह व्हिडीओ तीन दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे सर्वत्र संतापजनक प्रतिक्रिया उमटली. त्या समाजकंटकाच्या घरावर मोठा जमाव धडकला. दगडफेक करून आरोपीच्या वाहनाची तोडफोडही करण्यात आली. गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणात आरोपी समाजकंटकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याच्या पीसीआरची मुदत आज संपणार होती. त्यामुळे पोलीस त्याला न्यायालयात हजर करण्याच्या तयारीत असतानाच गिट्टीखदानमध्ये मोठा मोर्चा काढला जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर, गिट्टीखदानमध्ये दुपारी १२ वाजतापासून जागोजागी बॅरिकेडस् लावण्यात आले. मोठा पोलीस ताफा नियुक्त करण्यात आला. ठिकठिकाणी नाकेबंदीही करण्यात आली. मोर्चा निघाल्यास कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलीस सज्ज होते, मात्र मोर्चा निघालाच नाही. त्यामुळे पोलिसांना दिलासा मिळाला.
---
व्यापाऱ्यांचाही सकारात्मक प्रतिसाद
मोर्चात कोण कुठून सहभागी होणार याची पोलिसांकडे कसलीही माहिती नव्हती. मात्र कुणी समाजकंटक दगडफेक किंवा दुसरा कोणता आक्षेपार्ह प्रकार करून वातावरण चिघळवू शकतो, याची कल्पना असल्याने व्यापाऱ्यांनी पोलिसांना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी आपापली दुकाने बंद ठेवली. सायंकाळपर्यंत कुठलाही मोर्चा न आल्याने व्यापाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.
---