नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्याने कोरोनाबाधितांची दोन आकडी संख्या गाठली आहे. ही धोक्याची घंटा असून तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वेळीच निर्बंध लावणे आवश्यक आहे. पुढील दोन-तीन दिवसांत नागपूर जिल्ह्यामध्ये कडक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.
सोमवारी पालकमंत्री राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोनाच्या संदर्भात आढावा बैठक घेतली. सध्या गेल्या दोन दिवसांपासून बाधित रुग्ण दोन आकडी संख्येत वाढले आहेत. अशीच सुरुवात दुसऱ्या लाटेची देखील झाली होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेची सुरुवात जिल्ह्यात झाली आहे, असे समजून उपाययोजना करण्याबाबत प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी एकमत व्यक्त केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची व शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉकर्स, उद्योजक, हॉटेल व्यावसायिक आणि माध्यम प्रतिनिधी यांच्या बैठकी घेऊन कशा प्रकारचे निर्बंध लावायचे याबाबतचा निर्णय प्रशासनाने घ्यावा, पुढील तीन दिवसांत यासंदर्भातील निर्णय घोषित करावा, अशी सूचना त्यांनी केली. रेस्टॉरंटच्या, दुकानांच्या वेळा कमी कराव्या लागणार आहेत. विकेंडला दोन दिवस बाजारपेठा बंद ठेवाव्या लागणार असल्याचे राऊत म्हणाले. प्रशासनामार्फत पुढील तीन दिवसांनंतर नागपूर जिल्ह्यातील निर्बंधांची घोषणा केली जाणार आहे.
तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता रुग्णालयात बेडची संख्या पुरेशी आहे. ऑक्सिजनही मुबलक आहे. दुसऱ्या लाटेत अहोरात्र काम केलेल्या डॉक्टरसह वैद्यकीय स्टाफही सक्षम आहे. उत्सवापेक्षा लोकांचा महत्त्वाचा असल्याने निर्बंध लावावे लागणार असल्याचे राऊत म्हणाले. बैठकीला पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी विमला आर., महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त अस्वती दोरजे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, मेयोच्या अधिष्ठाता डॉ. भावना सोनवणे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, आएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर उपस्थित होते.
७८ सॅम्पल पाठविले जीनोम सिकेंससाठी
राऊत म्हणाले, सोमवारी १३ रुग्ण सापडले आहे. यात १ मुलगासुद्धा आहे. १२ लोकांचे लसीकरणाचे दोन्ही डोस झाले आहेत. व्हॅक्सिन घेतल्यामुळे बिनधास्त राहू नये. ७८ सॅम्पल जीनोम सिकेंससाठी पाठविले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर आयसीएमआरच्या गाईडलाईननुसार उपाययोजना करण्यात येईल.