लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू विक्री करण्यास मुभा दिली आहे. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवरही कारवाईचे आदेश आहे. मात्र त्यानंतरही नागपूर शहरातील रस्त्यावर फळ विक्रेते, भाजी विक्रेते ठिकठिकाणी दिसतात. तसेच विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची संख्या पुन्हा एकदा वाढली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्ह्यात रुग्णसंख्येने कळस गाठला आहे. दररोज जिल्ह्यात पाच ते सहा हजार रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाबाधितांची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने पोलीस तसेच महापालिका प्रशासनाला विनाकारण बाहेर पडणाऱ्यांच्या विरोधात कारवाईच्या सूचना केल्या आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकानेही केवळ सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र पोलीस आणि मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने शहरात विनाकारण फिरणारे नागरिक तसेच फेरीवाले व विक्रेते रस्त्यावर दिसत आहेत.
रुग्णालय परिसरात नारळपाणी व फळ विक्रेत्यांची दुकाने सकाळी ११ नंतरही सुरू असतात. शहरातील मुख्य बाजारपेठ वगळता सक्करदरा, तुकडोजी पुुतळा चौक, पारडी, दिघोरी, टेका नाका, पाचपावली, जयताळा, महाल, मोमीनपुरा, काटोल रोड यासारख्या ठिकाणी रस्त्याच्याकडेला फेरीवाल्यांच्या फळे आणि भाजीच्या हातगाड्या सकाळी ११ नंतरही उभ्या असतात. त्यामुळे नागरिकही या हातगाड्यांवर खरेदी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
वस्त्यात भाजी विक्रेत्यांच्या गाड्या सकाळी ११ नंतरही फिरत असतात तसेच दुकानातून विक्री होत आहे. शहरातील रस्त्यावर पोलिसांनी काही दिवस कठडे उभारले होते. आता नावापुरतेच असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी पोलीस कर्मचारी नसतात. कोणत्याही प्रकारची अडवणूक केली जात नसल्याचे चित्र आहे.
...
पिठगिरण्यांवर गर्दी
शासनाच्या आदेशानुसार पिठगिरण्यांची वेळ सकाळी ७ ते ११ करण्यात आली आहे. मोजक्याच असलेल्या परिसरातील पिठगिरण्यांवर लोकांची गर्दी होत आहे. एक-दोन तास दळणासाठी थांबावे लागत आहे. पिठगिरण्यांना सकाळी व सायंकाळी सुरू ठेवण्याला परवानगी दिली तर गर्दी होणार नाही, अशी माहिती पिठगिरणी चालकांनी दिली. गर्दीमुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.