नागपूर - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. तसेच, जिल्हा प्रशासनाकडून कोरोना नियमावलीसंदर्भात कडक अंमलबजावणीचेही आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी राज्यातील जनेतेशी संवाद साधला. त्यावेळी, राज्यात पुढील काही दिवसांसाठी सार्वजनिक कार्यक्रम, मोर्चे, आंदोलन, सभा आणि गर्दीचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच, मी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आदेशही दिल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले. त्यानंतर, आज नागपूर जिल्ह्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला आवाहन करताना सूचक इशारा दिला आहे, कोरोना टाळण्यासाठी मास्क घाला, शिस्त पाळा अन्यथा लॉकडाऊन करू असं सांगत पुढील ८ दिवस महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाचा दिमाखदार सोहळा रद्द केल्याचेही त्यांनी सांगितलं. त्यानंतर, जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्र्यांकडूनही बैठकांचा धडाका सुरु आहे. नागपूरचे पालकमंत्री मा. डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर जिल्ह्यात व शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्यामुळे त्यावर उपाययोजना लागू करण्यासाठी कठोर निर्णय आज जाहीर केले. 7 मार्चपर्यंत हे निर्बंध कायम असणार आहेत.
मा. मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली “मी जबाबदार” मोहीम शहरात व जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणार.
कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस दिनांक 7 मार्चपर्यंत बंद ठेवणार.
जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा शनिवार व रविवार (अत्यावश्यक सेवा -वृत्तपत्र, दूध भाजीपाला, फळे, औषध पेट्रोल पंप वगळून) बंद ठेवणार.
आठवडी बाजारामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजार दिनांक 7 मार्चपर्यंत बंद ठेवणार.
जिल्ह्यातील हॉटेल (रेस्टॉरंटस्) 50 टक्के क्षमतेने रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी.
लग्न, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रम दिनांक 7 मार्चपर्यंत बंद. परंतु मंगलकार्यालय/ लॉन्स/रिसॉर्ट दिनांक 25 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत बंद राहतील.
कोविड सेंटर पुन्हा सुरु करणार.
कोरोना प्रतिबंधासाठी गृहभेटीची संख्या वाढवून फ्ल्यू, आएलटी तसेच सारीची तपासणी करणार.
शहरातील तसेच जिल्ह्यातील नवीन हॉटस्पॉट झोन येथे इमारत, लेन, मोहल्लानिहाय मायक्रोकन्टोन्मेंट झोन तयार करुन सक्तीने उपाययोजना. हॉटस्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रित.
मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई.
नियम पाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी .
शासकीय आणि खासगी प्रयोगशाळेमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन नमुना तपासणी.त्रिसूत्रीचे पालन अनिवार्य.
कोविडसंदर्भात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा दररोज विभागीय आयुक्त आढावा घेणार.
मीच जबाबदार
पक्ष वाढवुया, कोरोना नको वाढवुया असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आंदोलन करणाऱ्यांनाही विनाकारण आंदोलन न करण्याचं सूचवलं. तसेच, पुढील काही काळासाठी राज्यात मिरवणुका, मोर्चे, यात्रा आणि आंदोलनांना बंदी घालण्यात येत असल्याची घोषणाच केली. एका यंत्रणेवर ताण टाकायचा आणि आपण बेभान वागायचं, हा त्या एका यंत्रणेवर केलेला अमानुषपणा नाही का, सगळ्यांना आयुष्य जगालया पाहिजेय, असेही ते म्हणाले. तसेच, माझे कुटुंब माझे जबाबदारी ही मोहीम आपण यशस्वी केली, त्यानंतर आता आणखी एक मोहीम आपण राबवली पाहिजे. होय, मीच जबाबदार... प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागणं म्हणजेच होय मीच जबाबदार. आपली जी बंधने आहेत, घराबाहेर पडताना मास्क, हाताला सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर हे पाळालयाच हवं. पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मी एक सूचना केली. आपल्याकडे 24 तास असतात, या 24 तासांची नीट विभागणी केल्यास नियंत्रण ठेवता येईल. वर्क फ्रॉम होमद्वारेही आपण कामाची विभागणी करु शकतो. हीच आपली नवीन मोहिम आहे, जी आपली जबाबदारी आहे, होय मीच जबाबदार... असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.