नागपूर विद्यापीठ : प्रथमच जाहीर केले वेळापत्रकनागपूर : गेल्या काही वर्षांपासून परीक्षा प्रणालीत दिसून येणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने कंबर कसली आहे. उन्हाळी परीक्षांमध्ये कुठल्याही पद्धतीने वेळापत्रकावरून गोंधळ होऊ नये याकरिता परीक्षा विभागाने सावध पावले उचलली आहेत. डिसेंबर महिन्यातच लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता प्रात्यक्षिक परीक्षांचेदेखील वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रथमच विद्यापीठाने अशातऱ्हेने प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.परीक्षा विभागाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार वार्षिक प्रणालीच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा १ फेब्रुवारीपासून सुरू होतील. पहिल्या व तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा २४ फेब्रुवारीपर्यंत चालेल. तर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २५ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत चालतील. यानंतर सेमिस्टर प्रणालीच्या प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यात येतील. १६ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत या परीक्षा चालतील. यंदा प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक ‘आॅनलाईन’ जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांची सुविधा झाली आहे. शिवाय महाविद्यालयांना परीक्षा आयोजनासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. महाविद्यालये कोणत्या तारखांना परीक्षा घेणार व ‘इंटर्नल’ कोण राहणार, याची माहिती २० जानेवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देश परीक्षा विभागाकडून देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)अन्यथा महाविद्यालयांना दंडप्रात्यक्षिक परीक्षांसाठीचे ‘सेशनल’ गुणपत्रके लेखी परीक्षा सुरू होण्याच्या १५ दिवस अगोदर ‘आॅनलाईन’ पद्धतीने पाठवायचे आहेत. दर महाविद्यालयांकडून ठराविक कालावधीत ही गुणपत्रके परीक्षा विभागाला प्राप्त झाली नाही तर दरदिवशी एक हजार रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात येईल, असे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रात्यक्षिक परीक्षांसाठी सावध पाऊल
By admin | Published: January 05, 2015 12:54 AM