मौदा : मागील काही दिवसांत नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता तालुक्यातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मौदा तालुका आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. ताप, सर्दी व खोकला अशी लक्षणे दिसून आल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रावर जाऊन कोरोना चाचणी करून घ्यावी तसेच प्रत्येकाने मास्क वापरावे, वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, लग्न समारंभ, सार्वजनिक सभासमारंभात जाणे टाळावे तसेच ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
एखाद्या नागरिकाचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्यास स्वत:ला विलगीकरण कक्षात ठेवून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावा. तसेच खासगी आस्थापना, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मौदा तालुका आरोग्य अधिकारी रूपेश नारनवरे यांनी केले आहे.