लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका कर्मचारी व शिक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन, चर्चा करूनही न्याय मिळत नाही. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास १० जूनपासून बेमुदत संप करण्याचा इशारा राष्ट्रीय नागपूर काॅर्पोरेशन एम्प्लाॅईज असोसिशनने मनपा प्रशासनाला दिला आहे.
कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळावी, सेवानिवृत्त कर्मचारी व शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा, जानेवारी २०२१ नंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी, शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळावा, जीपीएफ व डीसीपीएसची रक्कम त्वरित कर्मचारी व शिक्षकांच्या बँक खात्यात जमा करावी. शासन निर्णयानुसार १०, २० व ३० वर्षांची सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्यात यावी. कोरोना काळात संसर्गामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा सुरक्षाकवच योजनेंतर्गत ५० लाख देण्यात यावे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपावर नोकरीत सामावून घ्यावे, मनपात प्रतिनियुक्तीवर श्रम अधिकारी मागविण्यात यावा. आदी मागण्या मार्गी लावाव्यात अन्यथा आंदोलन करू, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, रंजन नलोडे, प्रवीण तंत्रपाळे, ईश्वर मेश्राम, बाबा श्रीखंडे, संजय मोहले, हेमराज शिंदेकर, बळीराम शेंडे, अभय अप्पनवार, योगेश बोरकर, कुणाल यादव, राहुल अस्वार, संजय गाटकिने आदींनी दिला आहे.