लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संसर्गाच्या काळात एकीकडे डॉक्टरांची कमतरता जाणवत असताना, दुसरीकडे मागील दोन दिवसांपासून मेयो-मेडिकलमधील ३५० इंटर्न डॉक्टर संपावर गेले आहे. बुधवारी संपाचा दुसरा दिवस होता व प्रशासन-डॉक्टरांच्या दरम्यान चर्चेतून तोडगा निघू शकला नाही. मार्डने इंटर्नच्या मागण्यांची बाजू घेतली असून, जर त्यांची पूर्तता झाली नाही, तर निवासी डॉक्टरही संपावर जातील, असा इशारा देण्यात आला आहे.
बुधवारी मेयो रुग्णालयाच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर इंटर्न डॉक्टरांनी निदर्शने केली. गुरुवारी मागण्या मान्य झाल्या नाही, तर इंटर्नकडून धरणे आंदोलन करण्यात येईल. आमचा संप सुरू असून, प्रशासनाकडून मागण्यांबाबत कुठलेच लेखी आश्वासन मिळालेले नाही. मुंबई, पुणे जिल्ह्यातील डॉक्टरांना कोरोना सेवा दिल्यानंतर अतिरिक्त मानधन देण्यात येत आहे, तर राज्यातील इतर जिल्ह्यांतील इंटर्न डॉक्टरांसोबत भेदभाव करण्यात येत आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे इंटर्न डॉक्टरांचे प्रतिनिधी डॉ.शुभम नागरे यांनी सांगितले.
अकोला, औरंगाबाद मेडिकल कॉलेजचे इंटर्न डॉक्टरही त्यांच्या पद्धतीने आंदोलन करत आहेत. गुरुवारी परत एकदा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यात येईल, तरीही काही झाले नाही तर धरणे आंदोलन करण्यात येईल. कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या इंटर्न डॉक्टरांच्या जीवाला धोका आहे. त्यांना विमा कवच मिळावे. भत्त्यांसोबतच त्यांना क्वारंटाइनचीही सुविधा मिळायला हवी, या त्यांच्या मागण्या आहेत.
सेंट्रल मार्डने पंतप्रधानांना लिहिले पत्र
नीट पीजीसारख्या परीक्षा स्थगित करण्याच्या निर्णयावरून महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. परीक्षा स्थगित करण्याच्या निर्णयामुळे नीट व इतर परीक्षांची तयारी करणाऱ्यांचे मोठे नुकसान होईल. हा निर्णय अयोग्य आहे. डॉक्टर कोरोना संसर्गाच्या काळात पूर्ण निष्ठेने काम करत आहेत. या निर्णयाची केंद्राने समीक्षा करावी, अशी मागणी सेंट्रल मार्डचे सरचिटणीस डॉ.अर्पित धकाते यांनी केली आहे.