लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात रोहित रामटेके याच्या इशाऱ्यावर हनी ट्रॅप करून अल्पवयीन मुलीकडून गँगरेप प्रकरण घडवून आणणारी युवती ही अल्पवयीन मुलींना देहव्यापारात ओढण्याचे काम करीत होती. वाठोडा ठाणेअंतर्गत सापडलेल्या देहव्यापाऱ्याच्या अड्ड्याची तपासणी केल्यानंतर हा आश्यर्चजनक खुलासा उघडकीस आला आहे. यामुळे रामटेके टोळीसाठी काम करणाऱ्या युवतीच्या अडचणी वाढल्या आहेत.
दीड महिन्यापूर्वी १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अजनीत गँगरेप झाला होता. यात अमित लोखंडे, प्रशीक गोटे, दत्तू उर्फ खटीक दाभणे, आणि बिट्टू वाघमारे याला अटक करण्यात आली होती. लोकमतने हे सर्व प्रकरण एका योजनेंतर्गत घडवून आणण्यात आल्याचे उघडकीस आणले होते. पोलिसांनी तपास केल्यावर रोहित रामटेकेने एका युवतीच्या माध्यमातून हनी ट्रॅप अंतर्गत हा प्रकर घडवून आणला असल्याचे उघडकीस आले होते. या आधारावर पोलिसांनी भा.दं.वि. कलम १२० (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करून रोहित रामटेकेला अटक केली. तेव्हापासून संबंधित युवती फरार झाली. तिच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात पीडित तरुणीचे अपहरण केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या एसएसबीने १७ मे रोजी वाठोडा पोलीस ठाणे हद्दीतील मोतीलालनगर येथे धाड टाकून अर्चना शेखर वैसंपायन नावाच्या महिलेला देह व्यापाराचा अड्डा चालविताना पकडले. अर्चनाच्या अड्ड्यावर तीन अल्पवयीनसह एक युवतीही सापडली. अर्चना पूर्वी अजनीत भाजीपाल्याचा ठेला लावायची. नंतर ती या धद्यात उतरली. अल्पवयीन मुलींना विचारपूस करताना अजनीतील हनी ट्रॅप प्रकरणातील युवती यात सहभागी असल्याची माहिती मिळाली. अजनीत भाजीपाला विकताना अर्चना त्या युवतीच्या संपर्कात आली. तिच्या मदतीने अर्चना देहव्यापाराचा अड्डा चालवू लागली. रामटेके टाेळीची सदस्य असलेली ती युवतीच अर्चनाला अल्पवयीन मुली उपलब्ध करून द्यायची. ती युवती अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढण्यात माहीर आहे. ती पैशांचे आमिष दाखवून मुलींना देहव्यापारासाठी तयार करते. या मोबदल्यात अर्चना तिला कमिशन देते. पैशासाठीच तिने रामटेके टोळीच्या इशाऱ्यावर अल्पवयीन मुलीचा वाापर करून हनी ट्रॅप घडवून आणला. यात अनेकजण सामील आहेत. या दिशेने सखोल चौकशी झाल्यास अनेक आश्चर्यजनक खुलासे उघडकीस येतील.
१५ मिनिटाच्या अंतराने ती बचावली
एसएसबीच्याची कारवाई केली त्याच्या १५ मिनिटापूर्वीच ती युवती त्या अड्ड्यावरून निघाली होती. त्यामुळे ती रंगेहात पकडण्यापासून वाचली. अजनी पोलिसही आता तिच्या शोधात आहेत.